Join us  

झायरा वसीम छेडछाड : माझे पती निर्दोष, पाय चुकून लागला होता : आरोपीची पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 5:02 PM

विकासच्या काकांचं निधन झालं होतं, त्या ठिकाणाहून आम्ही परतत होतो, त्यामुळे विकास मानसिकदृष्टया थकला होता, थकाव असल्यामुळे त्याला झोप लागली आणि झोपेत...

मुंबई: धाकड गर्ल आणि काश्मिरी अभिनेत्री झायरा वसीमशी विमानामध्ये असभ्य वर्तन करणा-या विकास सचदेव या व्यक्तीला सहार पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने 13 डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पण या प्रकरणी आरोपी विकासची पत्नी समोर आली असून विकासचा झायराला चुकून धक्का लागला होता असं त्यांनी म्हटलं आहे. विमानातून उतरण्यापूर्वी झायराची विकासने माफी देखील मागितली होती आणि तिने त्यावेळी माफी स्वीकारली देखील होती असं विकासच्या पत्नीने म्हटलं आहे.विकासच्या काकांचं निधन झालं होतं, त्या ठिकाणाहून आम्ही परतत होतो, त्यामुळे विकास मानसिकदृष्टया थकला होता, थकाव असल्यामुळे त्याला झोप लागली आणि झोपेत चुकून त्यांचा पाय झायराला लागला, माझे पती निर्दोष आहेत असं दिंडोशी न्यायालयाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या.   

काय आहे प्रकरण -

झायरा वसीमनं आपल्या इन्स्टाग्रामवर विमानातील छेडछाडीचा व्हिडीओ पोस्ट केला होता.  झायरा वसीम शनिवारी दिल्लीहून आईसह मुंबईला विस्तारा एअरलाइन्सच्या विमानातून येत होती. तिने बिझनेस क्लासचे तिकीट काढले होते. ‘1 एफ’ सीटवर ती व बाजूला तिची आई तर मागील ‘2 एफ’ वर 45 वर्षांचा एक इसम बसलेला होता. नऊ वाजून 20 मिनिटांनी विमानाने उड्डाण घेतले. थोड्याच वेळात संबंधित प्रवाशाने पायाच्या बोटाने झायराच्या मान व पाठीला स्पर्श केला. त्याबाबत सांगूनही दुर्लक्ष करत राहिल्याने अखेर ती घाबरून किंचाळली. मात्र कोणीही कर्मचारी किंवा प्रवासी तेथे आला नाही. झायराने या प्रकाराचे मोबाईलवर शूट करण्याचा प्रयत्न केला, परंतु विमानातील अंधूक प्रकाशामुळे ते शक्य झाले नाही. सुमारे दहा मिनिटे हा सगळा प्रकार सुरू होता. ‘विस्तारा एअरलाइन्स’च्या विमानातून दिल्ली- मुंबई प्रवास करीत असताना घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती 17 वर्षीय झायराने स्वत: विमानातून उतरल्यानंतर मध्यरात्री ‘इन्स्टाग्राम’वर शेअर केली. ती घटना सांगताना तिला अश्रू रोखता आले नाहीत. त्यानंतर जगभरातून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुंबई पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत संबंधित प्रवाशाविरुद्ध विनयभंग व बालक अत्याचार प्रतिबंधक कलम (पॉस्को) गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय व राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली होती.  जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्यासह राजकीय, सामाजिक व बॉलिवूडमधील विविध मान्यवरांनी याबाबत सोशल मीडियावरुन निषेध नोंदवत संबंधित विकृत प्रवाशावर कठोर कारवाईची मागणी केली होती. 

टॅग्स :झायरा वसीममुंबई पोलीस