Join us  

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, अभाविपचा दारुण पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 7:42 AM

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा युवासेनेचं वर्चस्व दिसून आले आहे.

मुंबई - मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा युवासेनेचं वर्चस्व दिसून आले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील  ( SENATE)   १० नोंदणीकृत पदवीधर संघाचे निकाल आज जाहीर झाले. या सर्वच जागांवर युवा सेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली असून मनविसे आणि अभाविपचा सुपडा साफ झाला आहे. 

अधिसभेच्या ५ जागांसाठी खुल्या प्रवर्गातून महादेव जगताप, प्रदीप सावंत, प्रवीण पाटकर, सुप्रिया करंडे आणि मिलिंद साटम हे उमेदवार विजयी झाले आहेत, तर राखीव प्रवर्गातील निवडणूकीतून अनुसूचित जाती या प्रवर्गातून निखिल जाधव, अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनराज कोहचाडे, विजा/ भज ( DT/NT)  प्रवर्गातून शशिकांत झोरे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून राजन कोळंबेकर आणि महिला प्रवर्गातून शितल शेठ देवरुखकर हे उमेदवार निवडून आले. नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या दहा जागांसाठी एकूण ६८ उमेदवार निवडणूकीसाठी होते. २५ मार्च २०१८ रोजी एकूण ५३ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले होते. या १० जागांच्या निकालासाठी दिनांक २७ मार्च २०१८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली होती.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडली. कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिनेश कांबळे यांनी या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडणूकीच्या कामी उपकुलसचिव (निवडणूक) रविंद्र साळवे,सहाय्यक कुलसचिव रिया पडवळ, विकास डवरे आणि त्यांच्या चमुसह निवडणूकीच्या कामात निवडणूक सल्लागार समितीचे सदस्य विशेष कार्य अधिकारी प्रा. अंबादास मोहिते आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव विकास पाटील यांच्यासह मुंबई विद्यापीठातील निवडणूक मतमोजणी प्रक्रियेत सहभागी झालेले सर्व उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिवांसह सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबई विद्यापीठनिवडणूक