Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या 'रक्ताचं नातं' आवाहनाला तरुणाईची साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताची टंचाई भासत असताना रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान ही सामाजिक बांधिलकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताची टंचाई भासत असताना रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान ही सामाजिक बांधिलकी ओळखून ‘लोकमत रक्ताचं नातं’ हे शिबिर संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात आहे. याचअंतर्गत महाविद्यालये बंद असताना ही सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून दहिसर येथे डिस्ट्रिक्ट ३१४१- रोट्रॅक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद शनिवारी मिळाला. हे शिबिर गरजूंना संजीवनी ठरेल, अशी अपेक्षा येथे रक्तदान केलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली. सदर रक्तदान शिबिरात २७ तरुणांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.

लोकमत समूहाच्यावतीने राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून १० जुलै रोजी दहिसर पूर्व येथे आशिष संकुलाच्या आवारात, गुरुकुल फन झोन येथे बोरिवली डिस्ट्रिक्ट ३१४१- रोट्रॅक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोरिवली रोटरी क्लबचे अध्यक्ष यशवंत गुजराल आणि बोरिवली पूर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश चौरसिया हे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि सहभाग प्रमाणपत्रे देऊन त्यांचा सत्कार आणि अभिनंदन केले. लोकमत समूह आणि टीकेईटीच्या प्रयत्नांचे कौतुक करत भविष्यातही याला आपण सहकार्य करू, अशी भूमिका यशवंत गुजराल यांनी मांडली. यावेळी आशिष संकुलाचे रहिवासी आणि तेथील कार्यकर्ते सुनील कुडतरकर यांनीही या शिबिराच्या योजनेचे कौतुक केले आणि आपला सहभाग दर्शवला.

महाविद्यालय बंद असून ऑनलाइन पद्धतीने अभ्यास आणि इतर उपक्रम सुरू असताना अभियांत्रिकीच्या विविध शाखांच्या आणि वर्षांच्या विद्यार्थ्यांना आवाहन करून रक्तदान शिबिरात सहभागी करून घेण्याची जबाबदारी रोट्रॅक्ट क्लब ऑफ ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या टीमने पार पाडली. यामध्ये या क्लबचे अध्यक्ष कुणाल मिस्कीन आणि सचिव भूषण नेहते यांनी शिबिराच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी पार पाडली. कोविड काळात अनेकांना कोविड होऊन गेल्याने आणि अनेकांचे लसीकरण झाल्याने रक्तदात्यांना शिबिरापर्यंत आणण्याचे काम आव्हानात्मक होते, मात्र अनेकांनी यासाठी मदत केल्याची माहिती त्यांनी दिली.

फोटो ओळ :

लोकमत समूहाच्यावतीने दहिसर पूर्व येथे आशिष संकुलाच्या आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोरिवली रोटरी क्लबचे अध्यक्ष यशवंत गुजराल, रोटरी क्लब बोरिवली पूर्वचे अध्यक्ष राजेश चौरसिया आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीची टीम.

100721\img_20210710_122233.jpg

दहिसर रक्तदान शिबिर