Join us  

युवा जागतिक बुद्धिबळ : ग्रॅण्डमास्टर आर. प्रग्नानंधाची विजयी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 4:09 AM

भारतीय ग्रॅण्डमास्टर आर. प्रग्नानंधा आणि महिला कँडीडेट मास्टर मृदुल देहानकर यांनी अपेक्षित कामगिरी करताना जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताला विजयी सुरुवात करून दिली.

मुंबई : भारतीय ग्रॅण्डमास्टर आर. प्रग्नानंधा आणि महिला कँडीडेट मास्टर मृदुल देहानकर यांनी अपेक्षित कामगिरी करताना जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताला विजयी सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी आपापल्या गटांत विजय मिळवताना दमदार सुरुवात केली.पवई येथे सुरू असलेल्या या स्पर्धेचे पहिल्यांदाच भारतात आयोजन होत असून या स्पर्धेत ६५ देशांतून सुमारे ४५० हून अधिका खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. १८ वर्षांखालील गटातून खेळणाऱ्या प्रग्नानंधा याने इटलीच्या बोट्टा मासीमिलियानो याचा ३५ चालींमध्ये पराभव केला. दुसरीकडे १६ वर्षांखालील गटातून खेळणाºया मृदुलने सहज बाजी मारताना झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिन ओतुरुबोवाला हिचा केवळ १९ चालींमध्ये धुव्वा उडवला. क्रिस्टिनने सिसिलियन बचावपद्धतीने सुरुवात केल्यानंतर मृदुलने अल्पावधीतच वर्चस्व मिळवले. तिने १२ व्या आणि १३ व्या चालीत क्रिस्टिनला प्रचंड दबावाखाली आणले. यानंतरच्या सहा चालींनंतर क्रिस्टिनने आपला पराभव मान्य केला. रशियाची महिला कँडीडेट मास्टर लेया गारीफुलीना हिनेही विजयी सुरुवात करताना बांगलादेशच्या महिला फिडे मास्टर नोशिन अंजुम हिला पराभवाचा धक्का दिला. लेयाने हळूहळू आक्रमक चाली रचताना ३९ चालींमध्ये बाजी मारली. 

टॅग्स :बुद्धीबळमुंबई