Join us  

मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी तरुणाईने घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 1:26 AM

‘बीच प्लीज’ मोहिमेचा उपक्रम : २५ महाविद्यालयीन विद्यार्थी सरसावले

मुंबई : शहरातील सर्वात दूषित नदी म्हणून मिठी नदीला ओळखले जाते. मिठी नदीतून येणारा कचरा आणि दूषित पाणी हे सर्व दादर चौपाटीच्या समुद्रात मिसळते. दादर येथील बीच प्लीज मोहिमेकडून दर रविवारी दादर चौपाटी स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. ६३ आठवड्यांपासून दादर चौपाटीवर सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेतून चौपाटी स्वच्छ झाली आहे. परंतु दादर चौपाटीवर येणारा कचरा हा मिठी नदीतून मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे बीच प्लीज मोहिमेद्वारे आता दादर चौपाटीनंतर मिठी नदीची स्वच्छता करण्यासाठी तरुणाई सरसावली आहे.

बीच प्लीज मोहीम ही २५ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरू केली असून ६३ आठवड्यांत दादर चौपाटीवरून ५०० टन कचरा उचलण्यात आला आहे. मात्र, दादर चौपाटीवर येणारा कचरा हा मिठी नदीतून येत असल्याने आता मिठी नदी स्वच्छ करण्याची मोहीम राबविली जात आहे. मिठी नदीमध्ये पार पडलेल्या स्वच्छता मोहिमेतून दोन टन कचरा उचलण्यात आला आहे, अशी माहिती मोहिमेच्या स्वयंसेवकांनी दिली.

बीच प्लीज मोहिमेचे संस्थापक मल्हार कळंबे यांनी सांगितले की, मिठी नदीजवळ राहणारे रहिवासी मिठी नदीच्या पात्रात शौचास बसतात. म्हणून परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी निर्माण झाली आहे. परिणामी मिठी नदीच्या स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवक यायला मागत नाहीत. त्यामुळे स्वच्छता मोहिमेला स्थानिकांकडून अडथळा निर्माण होत आहे. येथील स्थानिक नगरसेवकांना भेटून मिठी नदीत शौचास बसणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी काही उपाययोजना करता येतील का, या चर्चेसाठी नगरसेवकांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, नगरसेवक अयोध्येला गेल्याचे समजले, असे कळंबे म्हणाले.मिठी नदीच्या परिसरात जनजागृतीमिठी नदीच्या परिसरातील स्थानिक रहिवाशांकडे जाऊन मोहिमेतर्फे जनजागृती करण्यात येणार आहे. वस्त्यांमध्ये प्लॅस्टिक कलेक्शन ड्राईव्ह, ओला -सुका कचºयाचे वर्गीकरण हे उपक्रम राबविले जाणार आहेत.परिसरातला सुका कचरा जमा करुन पुनर्वापर करण्यासाठी पाठविला जाईल आणि त्यातून मिळणारा निधी हा स्थानिकांच्या समस्या सोडविण्यात वापरला जाणार आहे. उघड्यावर शौचास बसल्याने नागरिकांच्या आरोग्यास काय परिणाम होतो, यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

टॅग्स :नदी