Join us  

"तरुणाईने ७० तास काम करावं"; नारायण मूर्तीच्या विधानावर सुधा मूर्ती स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 5:04 PM

भारतात जास्त काम करणे सामान्य आहे. देशातील शेतकरी आणि मजूर खूप कष्ट करतात.

मुंबई - आयटी क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणाईला आठवड्यात ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. आठवड्यात ७० तास कामाच्या विधानावरुन नारायणमूर्ती ट्रोल झाले होते. त्यानंतरही त्यांनी तरुणाईला फटकारले होते. देशातील सुशिक्षित लोकांना वाटते की जास्त काम करणे दुर्दैवी आहे, असे त्यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटले होते. नारायण मूर्तीच्या या विधानानंतर पुन्हा एकदा त्यांना नेटीझन्स व ट्रोलर्संचा सामना करावा लागला. आता, नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधी मूर्ती यांनी ७० तास काम या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.  

भारतात जास्त काम करणे सामान्य आहे. देशातील शेतकरी आणि मजूर खूप कष्ट करतात. देशात ही एक सामान्य गोष्ट आहे आणि बहुतेक लोक असे आहेत, जे अंगमेहनतीने पैसे कमवतात, असे उदाहरण देत नारायणमूर्ती यांनी ७० तास काम केले पाहिजे, असा सल्लाच तरुणाईला दिला होता. पती नारायणमूर्ती यांच्या विधानावर आता सुधा मूर्ती यांनी प्रतिक्रिया देताना, त्यांच्या विधानाचे समर्थन केले. 

''मीदेखील या वयात ७० तासांपेक्षा जास्त काम करते. तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेतला पाहिजे. तुमच्या कामाबद्दल उत्साही राहा. मग तुम्हाला काम अगदी सुट्टीवर असल्याप्रमाणे भासेल", अशी प्रतिक्रिया सुधी मूर्ती यांनी दिली. 

काय म्हणाले होते नारायणमूर्ती

"देशाला प्रगती हवी असेल तर तरुणांनी रोज किमान १२ तास काम करायला हवं, म्हणजेच आठवड्याचे ७० तास. तेव्हाच भारत अशा अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करु शकेल, ज्या गेल्या दोन ते तीन दशकांपासून प्रचंड यशस्वी आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानमधील नागरिकांनी हेच केलं होतं," असे नारायणमूर्तींनी म्हटलं होतं.  

विदेशातील भारतीयांनी माझे समर्थन केले

एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, 'आमच्यापैकी ज्यांनी मोठ्या सवलतीत शिक्षण घेतले त्यांनी सरकारचे आभार मानले पाहिजेत. आपण किती भाग्यवान देशात आहोत, याचा विचार केला पाहिजे की आपल्याला फार कष्ट करावे लागले नाहीत. जेव्हा मी आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला तेव्हा सोशल मीडियावर खूप विरोध झाला. मला चुकीचे म्हणणारे बरेच लोक होते. काही चांगल्या लोकांनी माझे कौतुक केले. विशेषत: परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी मी बरोबर असल्याचे सांगितले. 'जर कोणी त्याच्या क्षेत्रात माझ्यापेक्षा चांगला असेल तर मी त्याचा आदर करतो. मी त्याला विचारेन की मी जे बोललो ते चुकीचे आहे का? मला नाही वाटत. माझे अनेक मित्र जे पाश्चिमात्य देशांमध्ये राहतात आणि त्यांच्यापैकी मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय आहेत त्यांनी सांगितले की तुम्ही बरोबर आहात आणि आम्हाला त्याचा आनंद आहे, असे नारायणमूर्ती यांनी म्हटले होते.  

टॅग्स :इन्फोसिससुधा मूर्ती