Join us

बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: September 20, 2014 01:15 IST

बेरोजगारीला कंटाळून 29 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटना बुधवारी भांडुपमध्ये उघड झाली.

मुंबई: बेरोजगारीला कंटाळून 29 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटना बुधवारी भांडुपमध्ये उघड झाली. कमल मदनलाल दर्यानामी (29) असे मृत तरुणाचे नाव आहे.
कमल भांडुप खिंडीपाडा येथील गुरुबक्ष नगरमध्ये पत्नीसमवेत राहण्यास होता. गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या कमलने बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घरात कुणीही नसताना लोखंडी खांबाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळाने घरी परतलेल्या पत्नीने हाक देऊनही कमलचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेजा:यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता कमलचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात कमलला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेदिवशी कमल आणि त्याची पत्नी दोघेही दर्गा रोड परिसरात असलेल्या ठिकाणी एका सत्संगाला गेले होते. त्यावेळी अध्र्या तासात परत येतो, असे सांगून कमल तेथून निघून गेला आणि घरी जाऊन त्याने आत्महत्या केल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसांपासून नोकरी मिळत नव्हती म्हणून तो नैराश्यात होता. यालाच कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. घटनास्थळी सुसाइड नोट सापडली नाही. कमलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला आहे.  (प्रतिनिधी)