मुंबई : मकर संक्रांतीत रंगणाऱ्या पतंग महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येक जण पुढे सरसावत असताना पक्षिप्रेमी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी पक्ष्यांंचा जीव वाचविण्यासाठी धडपडताना दिसले. नागरिकांना पतंगाच्या खेळात आनंद मिळत असला तरी यात पक्षी बळी पडत असल्याचे चित्र दिसून आले. मकर संक्रांतीदरम्यान पतंग उडविण्याचा खेळ अनेकांना प्रिय आहे. या पतंगासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा, चायनिज मांजा पक्ष्यांप्रमाणे मानवी जिवालाही घातक ठरतो. मुळात इतर मांज्याच्या तुलनेत हा मांजा वर्षानुवर्षे झाडांमध्ये अडकलेल्या अवस्थेत असतो. या दोन ते तीन दिवसांच्या आनंदोत्सवाचा फटका पक्ष्यांंच्या जिवावर वर्षभर बेतत असल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. त्यातही गेल्या दोन दिवसांपासून अग्निशमन दलाचे नियंत्रण कक्षातील आणि पक्षिप्रेमींंचे फोन खणखणत होते. मुंबईत पहिल्याच दिवशी मांज्यात पक्षी अडकल्याचे चाळीसहून अधिक फोन नियंत्रण कक्षाला आले. तर आज संक्रांतीला ६० हून अधिक कॉल आले. यातील काहींंचे प्राण वाचविण्यात यश आले तर काहींना जिवाला मुकावे लागले. गेल्या तीन दिवसांत तीन कबुतर, एक कावळा आणि बगळा पकडण्यात आले. यापैकी दोन कबुतर आणि एका कावळ्याचा मृत्यू झाल्याची माहिती पॉज संस्थेचे अध्यक्ष सुनीश सुब्रमन्यम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)
तुमचा खेळ होतो, त्यांंचा जीव जातो...
By admin | Updated: January 16, 2015 03:32 IST