Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही; त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:06 IST

बेस्टचे उत्तर; कारभार अजब असल्याचा मुलाचा दावालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या ...

बेस्टचे उत्तर; कारभार अजब असल्याचा मुलाचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या बेस्टच्या अनेक कर्मचाऱ्यांचा काेराेनामुळे मृत्यू झाला. यातील काही वाहक आणि चालकांना बेस्टकडून मदत मिळाली. मात्र हा आकडा हाताच्या बोटांवर मोजण्याएवढा असून, यापैकी बहुतांश मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंब नोकरी आणि विम्याच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहे. बेस्टचे वाहक म्हणून काम करणारे प्रभाकर तांबे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबालाही अद्याप मदत मिळालेली नाही. तुमच्या वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला मदत मिळणार नाही, असे उत्तर बेस्टने दिल्याचे तांबे कुटुंबीयांनी सांगितले.

उदय प्रभाकर तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट प्रशासनात नोकरी करणारे माझे वडील प्रभाकर तांबे हे दिंडोशी बस आगारात वाहतूक विभागात बस वाहक म्हणून काम करत होते. त्यांचा १ जून २०२० रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आमच्या घरात कमाविणारे कोणी नाही. त्यामुळे मला बेस्टमध्ये नोकरी मिळावी, सरकारने जाहीर केलेल्या विम्याचे पैसे मिळावेत, यासाठी मी बेस्ट प्रशासनाकडे अर्ज केला. सातत्याने पाठपुरावाही केला. दरम्यान, १५ मार्च २०२१ रोजी मला बेस्ट भवनातून फोन आला. तुमच्या वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळणार नाही. तुम्ही पुन्हा दुसरा अर्ज भरा. त्यासाठी तुम्हाला बेस्ट भवनात यावे लागेल, असे सांगण्यात आले.

बेस्टकडून मिळत असलेल्या अशा वागणुकीमुळे उदय यांनी नाराजी व्यक्त केली. उदय यांच्या वडिलांचे निधन कोरोनामुळे झाले आहे, असे मनपाने दिलेल्या सर्टिफिकेटवर नमूद आहे. तरीही बेस्ट प्रशासन ते मान्य करायला तयार नाही. यामुळे मानसिक त्रास होत असून, न्याय मिळावा, अशी मागणी उदय यांनी केली.

.......................