Join us

तरुणीला ऑनलाईन जॅकेट पडले ५३ हजारांना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:06 IST

मुंबई : इंस्टाग्रामवरून ऑनलाईन मागविलेल्या जॅकेट आणि टी शर्टसाठी तरुणीला ५३ हजार रुपये गमाविण्याची वेळ ओढावली आहे. याप्रकरणी काळाचौकी ...

मुंबई : इंस्टाग्रामवरून ऑनलाईन मागविलेल्या जॅकेट आणि टी शर्टसाठी तरुणीला ५३ हजार रुपये गमाविण्याची वेळ ओढावली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला.

काळाचौकी परिसरात राहणारी २१ वर्षीय तक्रारदार तरुणी एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करते. तिने फॅशन इंस्टाग्राम आयडीवरून १८ मे रोजी जॅकेट आणि टी शर्ट खरेदी करण्यासाठी एक मोबाईल नंबर मिळवला. त्या नंबरवर कॉल करुन तिने जॅकेट आणि टी शर्ट खरेदी केले. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने गुगल पे वर १ हजार रुपये पाठविण्यास सांगितले.

पैसे पाठवल्यानंतर त्याने ऑर्डर पाठविल्याचे सांगून एक ट्रॅकिंग आयडी नंबर पाठवला. २३ मे पर्यंत वाट बघूनही कुरिअर न आल्याने तिने पुन्हा त्या नंबरवर कॉल करुन विचारणा केली. तेव्हा त्याने दिलेल्या ट्रॅकर आयडीवर ट्रॅक करायची सूचना करुन कॉल ठेवला. दुसऱ्या दिवशी तिला एका अनोळखी व्यक्तीने कॉल करून कुरिअर डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम आल्याची बतावणी करत तिला एक लिंक धाडून ५१ रुपयांचे पेमेंट करण्यास भाग पाडले. पुढे आणखी एक लिंक पाठवून ती एका अनोळखी मोबाईल क्रमांकावर पाठविण्यास सांगितले. पुढे कुरियर ॲक्टिव्ह झाल्याचे सांगून त्याने फोन कट केला. थोड्या दिवसाने तरुणीच्या घरी एक पार्सल आले. त्यात फक्त जॅकेट होते. तिने पुन्हा संबंधित क्रमांकावर कॉल करून विचारणा करताच, ऑर्डर दिलेल्या त्या क्रमांकावर कॉल करुन विचारणा केली असता कुरिअरच्या दरम्यान टी शर्ट गहाळ झाले असल्याचे सांगून फोन ठेवला. पुढे खात्यातून ५३ हजार ७०० रुपये गेल्याचा संदेश मोबाईलवर धडकला. फसवणूक झाल्याची खात्री पटताच तरुणीने काळाचौकी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.