मुंबई : सायन कोळीवाडा येथील ३३ वर्षीय तरुणाने वाढदिवशीच गळफास घेत आयुष्य संपविल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी अॅण्टॉपहील पोलीस अधिक तपास करत आहेत.सायन कोळीवाडा येथील कोकरी आगार परिसरात पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीसोबत राहणाऱ्या विनोद देवेंद्र (३३) याने ही आत्महत्या केली आहे. त्याच परिसरातील अरुण नावाच्या तरुणासोबत त्याची मैत्री होती. त्यातूनच अरुणचे घरी ये- जा असायची. दरम्यान अरुणचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय विनोदला आला. त्याने, याबाबत पत्नीकडे विचारणा करताच पत्नी तीन महिन्यापूर्वी गावी निघून गेली.सोमवारी रात्री त्याने फोनवरुन तिच्याशी संपर्क साधला. त्यांच्यात वाद झाले. अखेर बुधवारी वाढदीवशीच कोणीही जवळ नसल्याच्या नैराश्येतून त्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मावशीने कॉल केला. मात्र, काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी घर गाठले. तेव्हा, विनोद हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.
सायनमधील तरुणाने वाढदिवशीच संपविले आयुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 02:26 IST