Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोकरदार तरुण निघाले लुटारू

By admin | Updated: April 20, 2016 02:41 IST

लोकल डब्यात मोबाइल पाडून तो प्रत्यक्षात प्रवाशानेच पाडल्याचा बनाव रचून त्यांना लुटणाऱ्या चार आरोपींना रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) अटक केली.

मुंबई : लोकल डब्यात मोबाइल पाडून तो प्रत्यक्षात प्रवाशानेच पाडल्याचा बनाव रचून त्यांना लुटणाऱ्या चार आरोपींना रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) अटक केली. अटक केलेल्या आरोपींची पार्श्वभूमी तपासली असता ते सर्व व्यवसाय आणि नोकरी करणारे असल्याचे समोर आले. हे सर्व आरोपी नालासोपारा येथे राहणारे असून वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वली रज्जाक ऊर्फ अली (२८), रूपेश केंभावी (वय २३), हुजेफा फक्री (२४) व खालीद वारशी (वय २६) हे नालासोपारा येथे राहतात. लोकलमधून प्रवास करताना स्वत:कडील मोबाइल पाडून आणि तो प्रवाशाने पाडल्याचा बनाव करून ते प्रवाशांसोबत वाद घालत. त्यानंतर त्या प्रवाशाला लोकल डब्यातून उतरवत आणि रिक्षात बसवून लुटत असत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांबाबत रेल्वेच्या गुन्हे शाखेकडे तक्रार आली होती. १ एप्रिलला सांताक्रूझ येथील गार्मेंट कंपनीत नोकरी करणारे दिनेश कांजी यांनाही हार्बर मार्गावर प्रवास करताना या चौघांनी लुटले होते. कपड्यांच्या मालासह टिळकनगर स्टेशनमध्ये उतरवून नंतर कांजी यांना रिक्षात बसवले. वांद्रे येथील सिटी बँकेच्या एटीएममध्ये नेऊन पैसे काढण्यास भाग पाडले. कपड्यांची पिशवी, मोबाइल फोन व एटीएम कार्ड असा ६९ हजार रुपये किमतीचा ऐवज व रक्कम चोरून नेली. याबाबत वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाने केला आणि या चारही आरोपींना गजाआड केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस निरीक्षक धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण काळे, पोलीस हवालदार अशोक होळकर, पोलीस नाईक संतोष भांडवले, पोलीस नाईक अतुल साळवी, पोलीस शिपाई प्रवीण घार्गे इत्यादींनी तपासात सहकार्य करून आरोपींना अटक केली. (प्रतिनिधी)