Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यास करण्यास सांगितल्याने वडील, आजोबांची हत्या करून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:06 IST

मुलुंड मधील घटना; मनोविकृतीतून कृत्यलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वडिलांनी अभ्यास करण्यास सांगितल्याने चिडून त्यांची व आजोबांची निर्घृणपणे ...

मुलुंड मधील घटना; मनोविकृतीतून कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वडिलांनी अभ्यास करण्यास सांगितल्याने चिडून त्यांची व आजोबांची निर्घृणपणे हत्या करून एका २० वर्षांच्या तरुणाने घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी मुलुंड येथे घडली. मुलाचे मानसिक संतुलन बिघडले होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिलिंद सुरेश मांगले (वय ५५), सुरेश केशव मांगले (८५) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. त्यांना तीक्ष्ण चाकूने भोसकल्यानंतर शार्दूल मांगलेने सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यात त्याला जबर मार लागला. मुलुंड पश्चिमेकडील एलबीएस मार्गावरील वसंत ऑस्कर सोसायटीत बिल्स सी इमारतीत फ्लॅट नंबर ६०४ येथे सुरेश मांगले हे मुलगा व वडील यांच्यासमवेत राहत होते. मिलिंद यांची पत्नी काही वर्षांपासून लहान मुलीला घेऊन वेगळी राहत होती. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाल्याने त्यांनी घरातील कामासाठी एक मदतनीस ठेवला होता.

शार्दूल हा बी.कॉमच्या अखेरच्या वर्षात शिकत होता. काही दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याची वडील व आजोबा यांच्याशी सारखी भांडणे होत होती. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मिलिंद यांनी त्याला अभ्यास करण्याची सूचना केली. त्यामुळे चिडलेल्या शार्दूलने स्वयंपाकघरातील चाकू घेऊन वडिलांवर वार केले. त्याला अडविण्यासाठी आजोबा सुरेश मांगले गेले असता त्याने त्यांच्याही पोटावर व छातीत वार केले. त्यांचा आरडाओरडा ऐकून मदतनीस स्वयंपाकघरातून पळत बाहेर आला. शार्दूलच्या हातात चाकू व दोघे खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून तो घाबरला आणि बाथरूममध्ये जाऊन लपून बसला. त्यानंतर शार्दूल गॅलरीत गेला तेथून त्याने खाली उडी मारली. सुमारे ६० फूट उंचावरून पडल्याने डोक्यावर मोठी दुखापत होऊन तो जागीच निपचित पडला.

ही माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांना परिसरातील अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह वाडिया रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटना समजताच सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील व अन्य अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. त्यांच्या नातेवाइकांना कळविण्यात आले आहे. याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

* त्यांनी दार ठोठावले...

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पावणेनऊच्या सुमारास मिलिंद यांनी शेजाऱ्यांचा दरवाजा ठोठावला. त्यांनी आतले दार उघडले आणि रक्ताने माखलेले मांगले त्यांना दिसले. पाठोपाठ शार्दूल चाकू घेऊन आला आणि त्याने मांगले यांच्या पाठीत पुन्हा वार केले. शेजाऱ्यांनी दार लावले, काही काळाने त्यांनी दार पुन्हा उघडले तेव्हा शार्दूल दारातच उभा होता आणि त्यांच्याकडे पाहत होता... मग, शार्दूल घरात गेला. त्यानंतर शेजाऱ्यांनी सोसायटीत इतरांना हा सगळा प्रकार कळवला.

* ...म्हणून त्याला इथे आणले

मिलिंद हे आठ वर्षांपूर्वी विभक्त झाले. त्यांची पत्नी आणि मुली घाटकोपर येथे राहात आहेत. तर, शार्दूल आजी-आजोबांकडे राहत होता. तेथे तो त्रास देऊ लागल्याने त्याला मिलिंद यांनी घरी आणले होते, अशी माहिती समोर येत आहे.