Join us

तुम्ही फक्त पोलिसांची प्रेमाने चौकशी करा, त्यांना पाठबळ मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:06 IST

हेमंत नगराळे; थकवा घालविण्यासाठी समुपदेशनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे पोलीस, आरोग्य यंत्रणांवर ताण आहे. यातही बंदोबस्तावर असलेल्या ...

हेमंत नगराळे; थकवा घालविण्यासाठी समुपदेशन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे पोलीस, आरोग्य यंत्रणांवर ताण आहे. यातही बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना, तुम्ही काही खाल्ले का? याबाबत केलेली विचारणाही त्यांना पाठबळ देणारी असेल, असे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तसेच वरिष्ठांकड़ून पोलिसांवरील थकवा घालविण्यासाठी समुपदेशनही करण्यात येत आहे.

कोरोना काळात रस्त्यावर उतरून जीव धोक्यात घालून कार्यरत असताना गेल्यावर्षी कोरोनामुळे ८ हजारांहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाबाधित झाले. तसेच आतापर्यंत ११२ हून अधिक पाेलिसांना जीव गमवावा लागला आहे. आपल्याकडे मनुष्यबळ कमी असल्याने बंदोबस्तावरील पोलिसांना पाणी, चहा, शक्य झाले तर काही खायला द्या. पोलिसांकडे डबे आहेत, पण सामाजिक भावनेच्या जाणिवेतून तुम्ही त्यांची प्रेमाने विचारपूस करा, त्यांना बरे वाटेल, असे आवाहन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पाेलीस अधिकाऱ्यांना केले.

तसेच दुसरीकडे ५० वर्षांपुढील विविध व्याधी जडलेल्या पोलिसांसाठी १२ तास सेवा, २४ तास आरामासाठी मुभा देण्यात आली. ही योजना सर्वांसाठी लागू करण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. जेणेकरून त्यांच्यावरील ताण कमी होण्यासाठी मदत होईल, असाही सूर पोलीस दलात आहे.

* मुंबई पोलीस दलातील एकूण पोलीस - ४५ हजार

* कुटुंब अन्‌ नोकरी सांभाळण्याची कसरत

कोरोनामुळे कामाचा वाढता ताण, त्यात कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याची कसरत सुरू असते. योगावर भर देत काम करत आहे.

- पोलीस शिपाई

* फिटनेसवर भर

थकवा घालविण्यासाठी छंद जोपासण्याबरोबरच फिटनेसवर भर देत स्वतःचा थकवा घालवत आहे. यात मानसिक ताण कायम आहे.

- महिला पोलीस अंमलदार

* १२/ २४ तास फॉर्म्युला सर्वांसाठी हवा...

सध्या पोलिसांवर विविध जबाबदाऱ्यांचे ओझे आहे. प्रत्येकाला आरामाची गरज आहे, जेणेकरून तो शेवटपर्यंत लढत राहील. यासाठी १२/ २४ तास फॉर्म्युला सर्वांसाठी हवा, असे एका पाेलीस निरीक्षकांनी सांगितले.

......................................