Join us  

तुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 2:23 AM

आमच्या पदरात काही देत नाही किमान धोंडे तर पाडू नका, भाजपला लगावला टोला

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्यावर मागची २५ वर्षे तुमच्यासोबत मित्रत्व असताना तुम्हाला जरा अच्छे दिन काय आले तुम्हाला शिवसेना नकोशी वाटते, याचा आम्हाला त्रास होतोे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. निमित्त होते शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘गोफ’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. शनिवारी दादरच्या शिवाजी मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोंडसुख घेतले.उद्धव ठकारे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. तुमच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर तुमच्या बरोबर नेहमी उभी असते. अशावेळी आमच्या पदरात काही देत नाही किमान धोंडे तरी पाडू नका अशी टीका त्यांनी केली. हिंदूत्वाच्या मुद्यावर निवडणूक जिंकणारा देशातला पहिला आमदार शिवसेनेचा होता. देश घडवणारे आता देशात उरलेले नाहीत. पण उपदेश करणारे खूप आहेत. आणि उपदेश करणारे जसे वागतात ते बघून धक्का बसतो, असे संजय राऊत यांच्या एका लेखात आहे. हीच सत्यपरिस्थिती आहे. देशात तशा व्यक्तीच राहिलेल्या नाहीत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले. या पुस्तक प्रकाशन सोहळ््याला भाजपचे त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर आणि राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे प्रमुख वक्ते होते. या दोघांनीही एकमेकांना शाब्दिक चिमटे काढले.शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाच्या दोन खंडांचे प्रकाशन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनीवास पाटील यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात भारत आणि जगभरातील दिग्गजांच्या लेखांचा, त्यांच्या अनुभवांचा संग्रह आहे. प्रकाशन सोहळ््याला परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते.शाब्दिक चिमटे : भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मोदी आणि शहा यांच्या कारभाराला कंटाळून भाजपचा त्याग केला. देशात असेच चित्र राहिले तर यादवी माजेल आणि भारत हुकुमशाही देश व्हायला वेळ लागणार नाही, अशी टीका केतकर यांनी केली. याला प्रत्युत्तर देताना देवधर यांनी शाब्दिक टोले लगावले. तुम्हाला काँग्रेसने नुकतीच खासदारकी बहाल केली आहे. त्यामुळे तुम्हाला भाजपविरोधात बोलणे भाग आहे. पण तुम्ही चिंता करू नका. आपल्या देशात जोपर्यंत हिंदूत्व टिकून आहे तोपर्यंत हुकुमशाही, यादवी कदापि येणार नाही. जे सोडून गेले त्यांना जाऊ दे, तुम्ही त्याची फार चिंता करू नका, असे देवधर म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरे