Join us
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांना योग शिकवणारा ‘योगी’

By admin | Updated: June 20, 2015 23:39 IST

यंदा दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला महत्त्व देऊन केंद्र सरकारचा एक उपक्रम म्हणून २१ जूनचा योग दिवस देशभरात आयोजित करण्याचा निर्णय घेतला

जयंत धुळप , अलिबागयंदा दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला महत्त्व देऊन केंद्र सरकारचा एक उपक्रम म्हणून २१ जूनचा योग दिवस देशभरात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि सारी शासकीय यंत्रणा या योग दिवसांच्या आयोजनात कार्यरत झाली. परंतु कोणतेही सरकारी पाठबळ नसताना ठाणे येथील पुंडलिक रामचंद्र निकम अर्थात निकम गुरुजींच्या अंबिका योग कुटीरमधून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन १९९७ पासून म्हणजे तब्बल १८ वर्षांपासून अलिबागमध्ये निरपेक्ष भावनेतून मोफत योग प्रशिक्षण देण्याचे सातत्यपूर्ण कार्य वीरेंद्र पवार करीत आहेत. गेल्या १८ वर्षांच्या त्यांच्या या व्रतस्थ योगसेवेत त्यांनी अनेक योग शिक्षक जसे तयार केले तसेच अलिबागमधील हिराकोट किल्ल्यातील जिल्हा कारागृहातील एक हजार बंदीवानांना योग प्रशिक्षण देऊन त्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यात यश मिळविले आहे. अलिबाग शहरात आतापर्यंत ५२ योगवर्गांचे आयोजन अंबिका योग कुटीरच्या माध्यमातून करून तब्बल ४ हजार ५०० नागरिकांना योग प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मोफत आणि व्रतस्थ योगसेवेमुळे आज वीरेंद्र पवार हे अलिबागमध्ये ‘योगा पवार’ म्हणूनच ओळखले जातात.सध्याचे युग अत्यंत गतिमान आहे. आणि त्यातून प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव निर्माण होतो. त्यातूनच पुढे मधुमेह, रक्तदाब, पाठदुखी (स्पाँडिलिसीस) यांसारख्या आजारांना अनेकांना सामोरे जावे लागते.आजच्या धकाधकीच्या जीवनातील या रोगांचे मूळ कारण शोधले तर ते ‘ताण-तणाव’ हेच असल्याचे सिद्ध झाले असून त्यावर मात करण्यासाठी योग हे उत्तम शास्त्र असल्याचे योग शिक्षक वीरेंद्र पवार यांनी सांगितले.योग नियमित केल्याने मानवी मनातील ताण-तणाव खात्रीने कमी होतो. त्याचबरोबर मानसिक शांती, रागावर नियंत्रण, शांत झोप, एकाग्रता वाढ, दैनंदिन कामकाजातील सुरळीतता, समजून घेण्याच्या क्षमतेत वाढ, चांगले आरोग्य, मानवी स्नेहसंबंध वृद्धी हे लाभ होतात, असा आपला गेल्या १८ वर्षांतील अनुभव असल्याचे सांगितले.