Join us  

विद्यापीठात १० हजार विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 8:41 PM

शारीरिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे सर्वांगिण विकास होत असून योग हे त्यासाठीचे एक मोठे साधन आहे.

मुंबई : शारीरिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे सर्वांगिण विकास होत असून योग हे त्यासाठीचे एक मोठे साधन आहे. योगावर लक्ष केंद्रीत केल्यास सर्वांगिण विकास साध्य करता येऊ शकल्याने अधिकाअधिक विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर यांनी केले.

मुंबई विद्यापीठात नजीकच्या काळात १० हजार विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित केले जाणार असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी योगासाठी अधिकाधिक लोकांना प्रेरित करावे असे त्यांनी सांगितले. आजमितीस विद्यापीठातील सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट बोर्ड आणि कैवल्यधाम मुंबई यांच्या सयुंक्त विद्यमाने मरीन लाईन्स येथील स्पोर्टस पवेलियन येथे २ फेब्रुवारी रोजी ‘योग सदभावना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नॅशनल कॉन्सील फॉर टिचर एज्युकेशनच्या अध्यक्षा डॉ. सतबीर बेदी, भा.प्र.से. यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती. 

मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित ६० महाविद्यालयातून सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी आयुष मंत्रालयाच्या कॉमन योगा प्रोटोकॉलच्या नियमनानुसार योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. आंतरराष्ट्रीय योग दिनी डॉ. एच.आर. नागेंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट बोर्डच्या सर्व संलग्नित संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना, संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून योगाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते आणि त्याचीच एक प्रचिती म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या नॅशनल कॉन्सील फॉर टिचर एज्युकेशनच्या अध्यक्षा डॉ. सतबीर बेदी, भा.प्र.से यांनी मुंबई विद्यापीठाच्या या उपक्रमाची प्रशंशा करत योगाचे महत्व विशद करुन राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अधिकाअधिक विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करावे असे सांगितले.

आयुष मंत्रालयाच्या नियमानुसार, योग प्रशिक्षणासाठी कॉमन योगा प्रोटोकॉल ६-८  तास थेअरी सत्र आणि विशिष्ट मूल्यांकनाद्वारे प्रशिक्षण दिले जाते. थेअरी सत्रांमध्ये योगाचा इतिहास, योगाच्या विविध शाखा, योगाचे समग्र स्वरूप आणि व्यक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान करण्याची क्षमता याचा समावेश होतो. शिक्षण आणि मूल्यमापन प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या अशा सर्व प्रशिक्षणार्थींना योगा इंटरनॅशनल प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रशिक्षणार्थीने अन्य बॅचला यशस्वीरित्या प्रशिक्षण दिल्यावर त्यांना मास्टर इंटरनॅशनल प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे समन्वयक प्रा. बाबासाहेब बिडवे यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ