Join us
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी आरोग्यासाठी ‘योग’दान महत्त्वाचे

By admin | Updated: June 21, 2017 05:51 IST

सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून ४४ वर्षांपूर्वी योगाचार्य सदाशिव निंबाळकर यांनी योग शिकविण्यास सुरुवात केली. योगसाधनेतून व्याधीमुक्त शरीर

प्राची सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून ४४ वर्षांपूर्वी योगाचार्य सदाशिव निंबाळकर यांनी योग शिकविण्यास सुरुवात केली. योगसाधनेतून व्याधीमुक्त शरीर आणि सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी वयाच्या ९२व्या वर्षी हे गुरुजी सक्रिय आहेत. योग क्षेत्रातील सातत्यपूर्ण भरीव कामगिरीच्या गौरवार्थ राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत २००४मध्ये गुरुजींना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.आज योगविद्येला मिळालेले महत्त्व, त्यासाठी साजरा करण्यात येणारा योगदिन हे अतिशय कौतुकास्पद आहे. ३०-४० वर्षांपूर्वीची परिस्थिती मात्र वेगळी होती. योगाबद्दल अनेक गैरसमजुती होत्या आणि योग्याभ्यासाकरिता योगी असणे आवश्यक आहे, असा विचार केला जायचा. हठयोग, आसने, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या फक्त ब्रह्मचारी, ऋषीमुनी सत्संगवाल्यांनीच करायच्या गोष्टी आहेत असा समज त्या काळी होता. भौतिक संसारात गुंतलेल्यांनी योगाला दुरूनच पाहिलं पाहिजे, अशा समजुती होत्या. अशा परिस्थितीत गुरुजींनी योगाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. मुंबईत मारवाडी कमर्शिअल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये त्यांनी ३१ वर्षे अध्यापन केले. सर्वसामान्यांचे आरोग्यसंवर्धन, रोगनिवारण, प्रतिबंधात्मक उपाय, शस्त्रक्रि येनंतरचे पुनर्वसन आदींसाठी योग कामी आला पाहिजे, या दृष्टिकोनातूनच निंबाळकर यांनी आतापर्यंत काम केले आहे. योगाचार्य निंबाळकर यांच्या पत्नी शकुंतला निंबाळकर यांनीही या कार्यात स्वत:ला वाहून घेतले. महापालिकेत शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असतानाही योगविद्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. योगशिक्षक घडविण्यासाठी टीचर्स ट्रेनिंग कोर्स तयार केला. ‘शैक्षणिक मानसशास्त्र’ हा विषयही त्या शिकवू लागल्या. शंखप्रक्षालन शिबिर, योगसाधना शिबिर, महिला दिनानिमित्त असलेली शिबिरे हे सगळे सुरू केले. सद्यस्थितीला ८० टक्के वर्ग स्त्रिया चालवित आहेत. ‘योगभूषण’, ‘शांताबाई पुरोहित पुरस्कार’, ‘नवी मुंबई भूषण’, ‘तेजस्विनी’ आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले.