Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात योगदिन उत्साहात

By admin | Updated: June 22, 2015 02:02 IST

युनोने जाहीर केलेल्या जागतिक योगदिनाचे औचित्य साधून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात योगा दिन साजरा करण्यात आला

ठाणे : युनोने जाहीर केलेल्या जागतिक योगदिनाचे औचित्य साधून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात योगा दिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून साजरा करण्यात येणारा योगदिन ही भारताची प्राचीन संस्कृती असून धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपण्यासाठी सर्वांनी योगासने करणे गरजेचे आहे असा संदेश यानिमित्त जगभरात देण्यात आला.योगदिनाचे औचित्य सााधून घंटाळी मित्र मंडळातर्फे सकाळी गडकरी रंगायतन तसेच हिरांनदानी इस्टेट , कोपरी आदि ठिकाणी योगासनांचे वर्ग घेण्यात आले. त्यानंतर गडकरी रंगायतन येथे संस्थेतर्फे योगांकुर या डिव्हीडी आणि आध्यानम या इंग्रजी पुस्तकाच्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गुरूदेव शंकर अभ्यंकर अणुशास्त्रज्ञ ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर, जिल्हाधिकारी आश्विनी जोशी, आ. संजय केळकर, उदय निरगुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.ठाणे महानगरपालिकेच्या वतीनेही नरेंद्र बल्लाळ सभागृहात जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी महापौर संजय मोरे यांनी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात केली. यावेळी पतंजली योग विद्यापिठाच्या रंजना तिवारी यांनी योगासनांचे महत्व पटवून दिले तसेच प्रात्यक्षिके दाखवली. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या सर्व शाळेत तसेच अग्नीशमन दलानेही योगासन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भाग असलेल्या शहापूर, मुरबाड या तालुक्याच्या ग्रामीण भागातही विविध शाळा आणि संस्थांनी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. धसई येथील महात्मा गांधी विद्यालयात जागतिक योगा दिनानिमित्त योगासने केली. सरळगाव, तळवली(आश्रम शाळा) तसेच परिसरात मोठ्या उत्साहात योगा दिन साजरा करण्यात आला.