मुंबई : योगाचे महत्त्व आता जगभरात पसरत आहे. योगाचा परिणाम हा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर दिसून येत असल्यामुळे, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे गेल्या दोन महिन्यांपासून एचआयव्हीग्रस्तांसाठी योगवर्ग सुरू करण्यात आले. या योगवर्गांमुळे एचआयव्हीग्रस्तांच्या शारीरिक व्याधी कमी झाल्या असून, मानसिक स्वास्थ्य मिळाले आहे, तर ६ एचआयव्हीग्रस्तांचा सीडी ४ काउंट वाढला असल्याचे ही दिसून आले आहे, असे सोसायटीच्या अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले. एचआयव्हीविषयी गेल्या कित्येक वर्षांपासून जनजागृती होत असली, तरीही अजूनही मानसिकतेत खूप बदल झाल्याचे दिसून येत नाही. एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. तरीही अनेकदा औषधांना गुण येत नसल्याचे दिसून येते. कारण औषधे शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात, पण मानसिक आरोग्य स्थिर नसल्यास त्याचा उपयोग होत नाही. ठाण्याच्या अंबिका योग कुटीर हे आजारांप्रमाणे रुग्णांना योगा शिकवते. त्यामुळे अंबिका योग कुटीरच्या मदतीने २० आॅगस्टला ३० एचआयव्हीग्रस्तांना योगाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. योगवर्गाला दोन महिने झाल्यानंतर मंगळवारी, सोसायटीच्या कार्यालयात एचआयव्हीग्रस्तांनी योगासने सादर केली. दोन महिन्यांपूर्वी योगवर्ग सुरू केले, तेव्हा ३० जण आले होते. त्यापैकी दोघांनी नंतर योगवर्ग सोडला, पण २८ जणांमध्ये बदल दिसून आले आहेत. ६ जणांचा आॅक्टोबरमध्ये सीडी ४ काउंट करण्यात आला. त्यांच्या सीडी ४ काउंटमध्ये ५० ते १५० ने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबरीने त्यांना मानसिक स्वास्थ्य लाभल्याचेही रुग्णांनी सांगितले, असे डॉ. आचार्य यांनी सांगितले. अंबिका योग कुटीरतर्फे अन्य आजारानुसार योग शिकवला जातो. सोसायटीने आमच्याशी संपर्क साधल्यावर, वडाला शाखेत पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर योगवर्ग सुरू करण्यात आला. योगामुळे शरीराला आणि मनाला फायदा होतो आहे, असे कुटीरचे रामचंद्र सुर्वे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)