Join us

गुजरात, दीव किनाऱ्याला यलो अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताउते चक्रीवादळाचा गुजरात आणि दीव किनाऱ्याला यलो अलर्ट ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताउते चक्रीवादळाचा गुजरात आणि दीव किनाऱ्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

चक्रीवादळ शनिवारी संध्याकाळी ६ वाजता उत्तरेकडे सरकत होते. त्याचा वेग ताशी १३ किमी होता. ते पणजीपासून २५० किमी, मुंबईपासून ६२० किमी आणि गुजरातपासून ८५० तर पाकिस्तानपासून ९६० किमी अंतरावर होते. प्रवासादरम्यान त्याचा वेग उत्तरोत्तर वाढत असून, ते आणखी रौद्ररूप धारण करत आहे. १८ मेच्या सकाळी ते गुजरात किनारी दाखल होईल, तर दुपारी हा किनारा पार करत पाकिस्तानच्या दिशेने आगेकूच करेल.

१५ मे रोजी चक्रीवादळाचा वेग आणि तीव्रता वाढेल. वाऱ्याचा वेग ताशी ८० ते १३५ किमी एवढा असेल. १६ मे रोजी यात आणखी वाढ होईल आणि चक्रीवादळ रौद्ररूप धारण करेल. तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी १४५ किमी असेल. १७ मे रोजीही अशीच परिस्थिती असेल. वाऱ्याचा वेग ताशी १७५ किमी असेल. १८ आणि १९ मेनंतर मात्र चक्रीवादळाचा जोर कमी होण्यास सुरुवात होईल.

* आज मुंबईत मुसळधार

चक्रीवादळाचा परिणाम म्हणून शनिवारी मुंबई शहर आणि उपनगर पूर्णत: ढगाळ होते. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची नोंद झाली नसली, तरी रविवारी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. महाराष्ट्र आणि गोव्याचा समुद्र किनारा खवळलेला राहील. परिणामी, मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.

* दहिसर, बीकेसी, मुलुंड जम्बाे केंद्रातील ५८० रुग्णांचे स्थलांतर

चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला, तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलुंड येथील जम्बाे कोविड केंद्रातील ५८० कोविड रुग्णांचे महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये शनिवारी रात्रीच स्थलांतर करण्यात आले. स्थलांतर केलेल्या रुग्णांमध्ये दहिसर कोविड केंद्रातील १८३, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) केंद्रातील २४३ आणि मुलुंड केंद्रातील १५४ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, रुग्णाचे स्थलांतर केल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांना कळवावी. ज्या रुग्णालयात प्रत्यक्ष स्थलांतर केले आहे, तिथे आवश्यक ती सर्व व्यवस्था उपलब्ध आहे, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आदेश अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले होते.

..................................