Join us  

यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणात होणार साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 1:41 AM

मुंबईत अडीच हजार मंडळे : गरबा व भजन यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द

ओमकार गावंड।

मुंबई : राज्यावर कोरोनाचे सावट अद्यापही कायम असल्याने गणेशोत्सवापाठोपाठ आता नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करण्याचे सरकारने आवाहन केले आहे. मुंबईत सुमारे अडीच हजार नवरात्रोत्सव मंडळ आहेत. मुंबईतील नवरात्रोत्सव मंडळ दरवर्षी नऊ दिवस गरबा, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. मात्र यंदा गर्दी जमेल असे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे यंदा गरबा तसेच इतर कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम साजरे न करण्याचा निर्धार मुंबईतल्या नवरात्रोत्सव मंडळांनी केला आहे. तसेच शासन वेळोवेळी ज्या सूचना देईल त्या सूचनांचे पालन करून शासनाला सहकार्य करण्याचे सर्व मंडळांनी ठरविले आहे.

नवरात्रोत्सवाचे स्वरूप अत्यंत साधे असल्याने यंदा पूर्वतयारीसाठी अत्यंत कमी दिवस लागणार आहेत, तसेच यंदा नवरात्रोत्सवापूर्वी अधिक मास आल्याने नवरात्रोत्सव मंडळांना तसेच मूर्तिकारांना पुरेसा वेळही मिळाला आहे. गणेशमूर्तीप्रमाणे देवीच्या मूर्तींची उंचीही चार फूट असल्याने मूर्तिकारांसमोरील चित्रही स्पष्ट झाले आहे.आमच्या मंडळाचे यंदाचे ७०वे वर्ष आहे. लालबाग-परळ हे मुंबईतील संस्कृतिक माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आमच्या मंडळाचा सांस्कृतिक खेळ व कार्यक्रम खेळण्यावर जास्त भर असतो. नवरात्रीचे नऊ दिवस नाटक, भजन तसेच इतर स्पर्धा अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. यंदा नवरात्रोत्सवावरही कोरोनाचे सावट असल्याने मंडळाकडून सर्व सांस्कृतिक कार्यक्रम अथवा गर्दी जमेल असे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री वेळोवेळी आदेश देतील त्याप्रमाणेच उत्सवाचे स्वरूप असणार आहे. शासनाच्यावतीने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करूनच यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करण्यात येईल.- शार्दुल म्हाडगूत,सहचिटणीस, परळ विभाग सार्वजनिकनवरात्रोत्सव मंडळ, परळमंडळाचे यंदाचे नवरात्रोत्सवाचे ३४ वे वर्ष आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा मंडळाने उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे योजले आहे. शासनाकडून आलेल्या नियमावलीचे योग्य पालन करून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी ९ दिवस विविध कार्यक्रम घेण्यात येतात. यात गरबा, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचा समावेश असतो. मात्र यंदा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यंदा विभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सम्मान केला जाणार आहे.- कल्पेश मढवी,सभासद, बाळ सेवा मित्र मंडळरहिवासी संघ, चेंबूर

टॅग्स :नवरात्री