Join us

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबाहेर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबईगणेशोत्सव म्हटले की सर्वात जास्त धामधूम असते ती म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची. घरोघरी जाऊन वर्गणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

गणेशोत्सव म्हटले की सर्वात जास्त धामधूम असते ती म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची. घरोघरी जाऊन वर्गणी आणण्यापासून ते एकत्र मंडपात प्रसाद खाण्यापर्यंतची ११ दिवस नुसती धमाल असते. मात्र, यंदा ही धमाल काही अनुभवता आलेली नाही. कारण याहीवर्षी सणांवर कोरोनाचे सावट असल्यामुळे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा केला जात आहे.

१) दादरचा राजा

दादरचा राजा गणपतीचे यंदाचे ८३ वे वर्ष आहे. या मंडळींनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्याप्रमाणे जास्त भाविक दर्शनासाठी येत नाहीत. त्यामुळे मंडळांच्या बाहेर शुकशुकाट आहे. गणेशोत्सवावर कोरोनाचे विघ्न असले तरी आपली परंपरा जपली पाहिजे, असे मत मंडळाचे कार्यकर्ते शशिकांत सावंत यांनी व्यक्त केले आहे.

2) राम मारुती रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

राम मारुती रोड सार्वजनिक गणेशोत्सवाचे यावर्षी ७६ वे वर्ष आहे. कोरोनापूर्वी या मंडळात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत होता. अनेक देखावे, चलचित्रे, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात होते. मात्र, यावर्षी उत्सव शासनाच्या नियमानुसार साजरा होत आहे.

३) टायकलवाडी गणेशोत्सव मंडळ

टायकलवाडी गणेशोत्सव मंडळाचे यावर्षी ३८ वे वर्ष आहे. या मंडळाकडून लोकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम भरविले जात होते. मात्र, कोरोनामुळे यावर्षी भाविक नसल्याने मंडपाच्या बाहेर शुकशुकाट पाहायला मिळतो. तसेच शासनाच्या नियमाचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला जात असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्ते चेतन गावठे यांनी दिली आहे.

४) श्री गणसिद्धी विनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

गणेशोत्सवाच्या काळात विविध कार्यक्रम आणि देखावे केले जायचे. मात्र, यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे कार्यकर्ते गौरव सावंत यांनी दिली आहे.

५) राववाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

सध्या गणेशोत्सवावर कोरोनाच विघ्न असल्याकारणामुळे गणेशोत्सव सर्व नियम पाळून साजरा होत आहे. पहिल्यांदा दर्शनासाठी भाविकांची रांग लागत असे; मात्र सध्या सगळीकडे सामसूम आहे.