Join us  

मळभ सरत असताना यंदा रसिकांना ‘दिवाळी पहाट’ची मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 6:40 AM

Diwali : कोरोनाच्या काळात मनोरंजन क्षेत्राला मोठा फटका बसला. शहर उपनगरात दिवाळीच्या काळात दोनशे ते तीनशे दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन होते.

- स्नेहा मोरे

मुंबई : दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे सांस्कृतिक विश्व पूर्णपणे ठप्प होते. आता कुठे तिसरी घंटा वाजली असून, ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. यावेळी उपस्थितीला निर्बंध असल्याने सभागृहांऐवजी मोकळ्या आकाशाखाली बहुतांश कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून सुमारे १० कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.

कोरोनाच्या काळात मनोरंजन क्षेत्राला मोठा फटका बसला. शहर उपनगरात दिवाळीच्या काळात दोनशे ते तीनशे दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन होते. यापैकी काही व्यावसायिक कार्यक्रम तिकिटे लावून बंदिस्त सभागृहात होतात, तर उर्वरित सर्व उद्यानांत पार पडतात. गायक, वादक, कलाकार, निवेदक, ध्वनिक्षेपक व्यावसायिक, मंडप व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांतील किमान पाच हजार जणांना यामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. 

प्रस्थापित कलाकारांबरोबरच अनेक नवोदितांनाही व्यासपीठ मिळते. या सर्व कार्यक्रमांमधून दिवाळीच्या आठवडाभरात आठ ते दहा कोटी रुपयांची उलाढाल सहज होते. कोरोना साथ नियंत्रणात राहिली, त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय इच्छुकांनी नागरिकांना सांस्कृतिक मेजवानी देण्याची तयारी केली आहे.

पुण्यात खासगी लॉन्स बुक पुण्यात आगामी काळात महापालिका निवडणुका असल्याने नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमध्ये छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे.महापालिकांच्या नाट्यगृहांमध्ये यंदा दिवाळी पहाट रंगणार असून, खासगी लॉन्सचीदेखील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नोंदणी झाली आहे. उद्यानांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे.

दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांशी संपर्क करून चर्चा सुरू केली आहे. जे आयोजक प्राधान्याने संपर्क करतील, त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.- सुभाष भागवत, मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर, कार्यवाह

नाट्य कलासृष्टीही नाटकांच्या प्रयोगांसाठी उत्सुक आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, यंदा नाटकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.- शिवाजी मंदिर व्यवस्थापन 

टॅग्स :दिवाळी 2021