Join us  

यंदा मतदान केंद्रांवर बालकांसाठी पाळणाघर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 7:38 AM

नव्याने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेतील मेडिकल किटमध्ये वेदनाशामक औषध, बॅण्डेज, ओआरएस पावडर, जखमेवर लावण्यासाठी पट्टी आदी साहित्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर एक वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध असणार आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांकरिता मतदान केंद्रांवर अत्यावश्यक किमान सुविधांची संख्या यावर्षी दुप्पट करण्यात आली आहे. मेडिकल किट, मतदान केंद्रांवर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघर, अंध आणि दिव्यांग मतदारांच्या वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन या सुविधा यावर्षी नव्याने करण्यात येणार आहेत.

नव्याने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेतील मेडिकल किटमध्ये वेदनाशामक औषध, बॅण्डेज, ओआरएस पावडर, जखमेवर लावण्यासाठी पट्टी आदी साहित्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर एक वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध असणार आहे. वाढत्या तापमानाची दखल घेताना मतदान केंद्रांवर महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व महिलांसोबत असलेल्या लहान मुलांसाठी मंडप टाकण्याच्या सूचना आहेत.मतदारांच्या सहाय्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केली जाणार आहे. त्यामध्ये राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट आणि गाइड विद्यार्थ्यांची मदत घेतली जाईल. हे विद्यार्थी मतदार रांगेचे व्यवस्थापन करण्याबरोबरच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी सहाय्य करतील. या स्वयंसेवकांसाठी पाणी व खाद्यपदार्थांची व्यवस्था असेल. महिला मतदारांसोबतच्या मुलांकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था होणार आहे. या ठिकाणी एक प्रशिक्षित सहायक या मुलांची काळजी घेण्यासाठी असेल. ज्या अंध व दिव्यांग मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे मतदानासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी केली असेल अशांसाठी वाहन व्यवस्था असेल.

टॅग्स :लोकसभा निवडणूकमुंबईमतदान