लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यशोदीप फाउंडेशन ही संस्था विक्रोळीच्या कन्नमवारनगरमध्ये गेली १५ वर्षे मार्गशीर्ष महिन्यात आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आली आहे. या वर्षी कोरोना रोगाच्या संकटात कार्यक्रमस्थळी होणारी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी संस्थेतर्फे फेसबुक लाइव्हद्वारे एकदिवसीय ‘श्रीकृष्ण-गोपी रास कथा’या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. सुरक्षित अंतर ठेवून व कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करून पार पडलेल्या या कार्यक्रमात भगवान श्रीकृष्ण-गोपिकांच्या रासलीला यावर कथा व भजने सादर करण्यात आली.
आळंदीहून आलेल्या ह. भ. प. महादेव महाराज तौर व त्यांचे सहकारी यांच्या रसाळ वाणीतून कथा व भजने श्रवण करण्याची संधी अनेक भाविकांना लाभली. दरवर्षी न चुकता या आध्यात्मिक कार्यक्रमाला हजर असणाऱ्या अनेक भाविकांना कोरोनाच्या महामारीत हा कार्यक्रम होईल का, याबाबत साशंकता असताना एक दिवस का होईना भगवान श्रीकृष्णांच्या कथा व भजने ऐकण्याची संधी प्राप्त झाल्याने अनेकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले.
या कथा, भजनांच्या श्रवणाने आपणा सर्वांना जे आत्मिक सुख लाभते ते या जगात इतर कशानेही आपणास लाभणार नाही. त्यामुळे गेली १५ वर्षे अविरतपणे चालू असलेला हा धार्मिक कार्यक्रम यापुढेही अनंत काळ चालू राहिला पाहिजे व आपल्या सर्वांनी त्याकरिता योग्य ते सहकार्य केले पाहिजे असे महाराजांनी सर्वांना सूचित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी कथा प्रवक्ते ह. भ. प. महादेव महाराज तौर व त्यांच्या सहकाऱ्यांचा कन्नमवारनगरमधील कृष्णकुंज सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला. सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोनमळे यांनी आभार मानले.
----------------------------------