Join us  

'पॅड वुमन' भारती लव्हेकरांच्या लढ्याला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 8:10 PM

मनोहर कुंभेजकर

देशातील गरजू महिलांना सॅनिटरी पॅड मधून संपूर्ण पणे सूट मिळावी यासाठी पॅड वुमन म्हणून ख्याती असलेल्या वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांच्या गेल्या 1 वर्षांच्या लढ्याला यश आले आहे.कारण केंद्र सरकारच्या जीएसटी कोन्सिलची आज नवी दिल्लीत बैठक झाली.या बैठकीत सॅनिटरी पॅड पूर्णपणे जीएसटी मधून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय  झाला.आमदार लव्हेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कडे पाठपुरावा केला होता.आज जीएसटी कोन्सिलने अत्यंत महत्वाचा निर्णय घेऊन देशातील ज्या सॅनिटरी पॅड परवडत नाही म्हणून वापरत नाही त्या करोडो महिलांना मोठा दिलासा दिला आहे असे त्यांनी अभिमानाने सांगितले.यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय अर्थमंत्री, मुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री यांचे जाहिर आभार मानले आहेत.

आमदार डॉ.लव्हेकर यांनी सॅनिटरी पॅड पूर्णपणे जीएसटी मधून वगळण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला होता.सॅनिटरी पॅड व डीस्पोजेबल वेडिंग मशीन हे पूर्वी आमदार फंडातून देण्यात येत नव्हते.आमदार लव्हेकर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठ पुरावा करून आणि अर्थमंत्र्यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळे आपला सॅनिटरी पॅड व डीसपोजल वेडिंग मशीन हे आमदार फंडातून देण्याचा निर्णय मान्य झाला.फेब्रुवारी 2017 मध्ये वर्सोवा, यारी रोड येथील प्राचार्य अजय कौल याच्या चिल्ड्रन वेलफेअर शाळेत राज्यातील पाहिले सॅनिटरी पॅड व डीस्पोजेबल वेडिंग मशीन बसवण्यात आले असे त्यांनी अभिमानाने सांगितले. 

महिलांचे ते 5 दिवस सुसह्य करण्याच्या उद्देशाने ' ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके ' ची स्थापना 28 मे २०१७ मध्ये ' जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवशी केली अशी माहिती त्यांनी दिली.

आमदार डॉ.भारती लव्हेकर यांच्या सॅनिटरी पॅड बँकेच्या लोक चळवळीतील त्याच्या अभूतपूर्व यशाबद्धल त्यांना गेल्या 20 जानेवारी 2918 रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा पॅड वूमन म्हणून गौरव केला होता.गेल्या २५ वर्षांपासून समाजकारण तसेच राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांना. मासिक पाळीसारख्या स्त्रियांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर उघडपणे बोलले जात नव्हते हे फार दुःख होते.एक महिला आमदार या नात्याने अन्य महिला जास्त व्यक्त होऊ लागायच्या आणि महिलांचे असंख्य प्रश्न त्यांना अधिक प्रकर्षाने जाणवू लागले. मासिक पाळीदरम्यान महिला कापड, झाडाची पाने, कोंबडीची पिसे, पेपर, मक्याच्या कणसाचे आवरण इत्यादी पर्यायी साधनांचा वापर करत असल्याने कळताच मी व्यथित झाले होते. 

देशातील ३५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. जगातील सर्व्हाकल कॅन्सरच्या रुग्णांपैकी २७ % रुग्ण हे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या अस्वच्छतेमुळे असतात. ८५%  महिला कापड, झाडाची पाने, कोंबडीची पिसे, पेपर, मक्याच्या कणसाचे आवरण इतर साधनांचा वापर रक्तस्त्राव थांबवण्यासाठी करतात.” मासिक पाळी दरम्यान वापरात असलेले कापड लपवून वाळवले जाते. त्यामुळे ते अर्धे ओले आणि अर्धे सुके राहते आणि त्याला कुबट वास येतो. सर्वसामान्यपणे स्त्रीला वयाच्या १२ व्या वर्षांपासून ५० व्या वर्षांपर्यंत दरमहा मासिक पाळी येते. आकडेवारी बघितली तर २ हजार २२० दिवस म्हणजेच ६ वर्षे १ महिना अशा मोठ्या कालावधीकरता महिलांना मासिक पाळीला सामोरे जावे लागते. आमच्या कार्यकर्त्यांना आणि महिलांना हे पटवून देण्यासाठी हा विषय आणि त्याचे महिलांच्या आरोग्यावर होणारे दूरगामी परिणामांबद्दल जागृत करायचे होते. आम्ही याविषयी उघडपणे चर्चा करू लागलो. कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्यासाठी अनेक आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. सामूहिक पॅड वाटपाच्या कार्यक्रमांचे आयोजन आम्ही करायला लागलो. पॅड घेणा-या  महिलांना संकोच वाटू नये आणि या चळवळीत त्यांचेही योगदान दिसावे यासाठी सॅनिटरी पॅड घेणा-या महिलांचे आम्ही फोटो काढू लागलो अशी माहिती त्यांनी दिली.

आमदार डॉ.भारती लव्हेकर यांच्या ' ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँकेच्या १ लाख ७ हजार महिला सदस्य असून त्यांना दरमहा नियमितरित्या १० सॅनिटरी पॅड मोफत देण्यात येतात. बँकेतर्फे मिळालेले ओळखपत्र दाखवून या महिला मोफत सॅनिटरी नॅपकिन्स मिळवू शकतात. मासिक पाळी दरम्यानची स्वच्छता आणि स्त्रियांना सॅनिटरी पॅड्स वापरायची सवय लागावी यासाठी आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी सॅनिटरी पॅड व डीस्पोजेबल व्हेंडिंग मशी बसवले आहेत.आतापर्यंत ओशिवरा आणि आंबोली पोलीस स्टेशन्स आणि मुंबई महानगरपालिका के पश्चिम वॉर्ड अशा ३ ठिकाणी सॅनिटरी पॅड  व  डीस्पोजेबल व्हेंडिंग  बसवण्यात आल्या असून वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील १० शाळांमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग व डीस्पोजेबल व्हेंडिंगमशीन बसवण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

मासिक पाळी येताना मुलीच्या मनात अनेक प्रश्न असतात तिची मानसिक अवस्था बिकट असते त्यामुळे आम्ही शाळांमध्ये मेन्स्ट्रुअल हेल्थ किट देतो जे एखाद्या फर्स्ट एड बॉक्स प्रमाणे असते. सॅनिटरी नॅपकिन्स, २ निकर्स, वेदनाशमन गोळ्या यांचा अंतर्भाव या मेन्स्ट्रुअल हेल्थ किट असतो. तसेच मुलीला मानसिक आधार कसा द्यावा या सूचनाही असतात. सर्वांना हे किट दिसेल आणि गरज आल्यास त्याचा उपयोग होईल या उद्देशाने आम्ही हे किट मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये बसवतो. मशिनीमधील पॅड संपायला आले कि संबंधित शाळा, कॉलेज किंवा पोलीस स्टेशन्स आमच्याशी संपर्क साधून पॅड्सची मागणी करतात. मशिन्स बसवणे त्या चालवण्यासाठीचे प्रशिक्षण, त्यांच्या देखभालीची जबाबदारी आमची बँक घेते. मासिक पाळी आणि यादरम्यान घेतली जाणारी स्वच्छता याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी ठिकठिकाणी अवेअरनेस कॅम्प भरवतो, अवेअरनेस पथकही पाठवतो. शालेय मुलींना आम्ही एक फॉर्म देऊन त्याद्वारे त्या मुलीला पाळी आली आहे का, ती आली असल्यास वेळेवर येते का याची सविस्तर माहिती मागवून घेतो.” असे त्यांनी सांगितले.

मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड वापरणे ही अत्यावश्यक बाब असून प्रत्येक स्त्रीला सॅनिटरी पॅड मिळावे हा ‘ती फाउंडेशन सॅनेटरी पॅड बँके’ मागील मुख्य उद्देश आहे. आज या बँकेने छेडलेल्या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सॅनिटरी पॅड बँकेला देशभरातून उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. देशातील विविध राज्य जसे पंजाब, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा, चंदीगड मधून चांगला प्रतिसाद लाभत आहे. कॅनडा आणि यूएस सारख्या देशातून प्रश्न विचारले जातात कि भारतात मासिक पाळी मध्ये स्त्रिया सॅनिटरी पॅड वापरत नाहीत का ? अफगाणिस्तान, पाकिस्तान, आफ्रिका सारख्या देशातून पॅड्स पुरवा अशी मागणीही येते. ज्यांना एखाद्या गरीब मुलीसाठी सॅनिटरी पॅड डोनेट करायचे असेल किंवा एखाद्या मुलीच्या पॅड्सचा खर्च उचलायचा असेल तर 'teefoundation.in वेबसाइट दिल्या गेलेल्या मोबाइलला क्रमांकावर संपर्क साधून या लोकचळवळीमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवू शकता. आणि 'ति' च्या पंखांना अजून बाळ मिळवून द्या मग ' ती' अधिक उंच भरारी घेण्यासाठी सज्ज होईल असे त्यांनी शेवटी सांगितले.