पनवेल : पोर्टेबल बाइक... बॅटरीवर चालणारी, एका ठिकाणाहून दुसरीकडे ढकलत नेता येणारी... ऐकून आश्चर्य वाटते ना? पण पनवेलच्या आकाश जाधव आणि अमर लखू या तरुणांनी खरोखरच अशी पोर्टेबल बाइक बनवली आहे. ही गाडी २५० किलो वजन वाहून नेऊ शकते. हॉस्पिटल, विमानतळ, हॉटेल अशा ठिकाणी आणि अपंग व्यक्तींसाठी तिचा उपयोग होऊ शकतो. लहानपणापासूनच उद्योगी असलेल्या आकाश जाधवने शालेय वयातच टाकाऊ वस्तूंपासून मोटारबाइक, चालता फिरता रोबोट, पितळी तारेच्या अंगठ्या, वॉलपेंटिंग, शाडूच्या मूर्ती, पेन्सील कार्व्हिंग असे अनेक प्रयोग केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या गुणांना निश्चित दिशा मिळाली. त्यातूनच त्याने मित्राबरोबर पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक बाइक व पाण्यात चालणारी रिमोटवरील स्पाय छोटी बोट बनवली. त्याने कोपरखैरणे येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री मिळवली आहे. खालापूर येथील विश्व निकेतन कॉलेजमधून विशेष अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. त्याने केवळ पाच हजार रुपयांत सर्किटद्वारे रिमोटवर चालणारी बोट तयार केली आहे. त्यात स्पाय कॅमेरा बसवला आहे. याचा उपयोग गुप्त माहिती मिळवण्यासाठी किंवा लहान मुलांच्या स्विमिंग पूलमध्ये होणार आहे. सध्या आकाश हा याच गाड्यांना अधीक चांगला आकार देऊन पेटंट मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. तसे झाल्यास त्याला या गाड्या अजून कमी खर्चात सर्वांसाठी बनविता येतील. (वार्ताहर)
तरुणाने साकारली पोर्टेबल बाइक
By admin | Updated: April 1, 2015 00:21 IST