नवी मुंबई : जुहूगाव येथील मरिन सेंटर क्लबमध्ये चालणाऱ्या अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ३३ जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये क्लबच्या मॅनेजरचाही समावेश आहे.जुहूगाव येथील मरिन सेंटर क्लबमध्ये अवैध हुक्का पार्लर चालत असल्याची माहिती परिमंडळ उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या पथकाला मिळाली होती. यानुसार मंगळवारी रात्री उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागराज मजगे, उपनिरीक्षक रोहन बगाडे यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी त्याठिकाणी जमलेली गर्दी हुक्काचे सेवन करून धूम्रपान करत असल्याचे आढळून आले. कोणताही परवाना नसताना क्लब मालकाने त्याठिकाणी हुक्का पार्लर सुरू केले होते. त्यानुसार क्लब मॅनेजर अब्दुल चौधरी याच्यासह ४ वेटर, २२ पुरुष ग्राहक व ५ महिला ग्राहक यांना अटक केल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. जुहूगाव येथील मरिन सेंटर क्लबमध्ये यापूर्वीही पोलिसांनी छापा टाकला होता. त्यावेळी जुगार खेळणाऱ्या काही लोकप्रतिनिधींसह इतर अनेकांवर कारवाई करण्यात आली होती. त्याठिकाणी हुक्का पार्लर चालवले जात होते. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली.(प्रतिनिधी)
जुहूगावात हुक्का पार्लरवर धाड
By admin | Updated: November 19, 2015 00:28 IST