Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटवर लेखन सहज उपलब्ध; पण माणसे नाहीत

By admin | Updated: June 19, 2017 03:20 IST

इंटरनेटवर लेखन सहज उपलब्ध आहे. परंतु इंटरनेटवर माणसे भेटत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचे वाचन करा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इंटरनेटवर लेखन सहज उपलब्ध आहे. परंतु इंटरनेटवर माणसे भेटत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचे वाचन करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तरुणांना केले.परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात शनिवारी आयोजित ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर लिखित ‘मनातली माणसं’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. नार्वेकरांचे पुस्तक म्हणजे नव्या पिढीसाठी ठेवा आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिका विजया वाड, ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र उपस्थित होते. पवार म्हणाले की, राधाकृष्ण नार्वेकर लिखित ‘मनातली माणसं’ हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या नव्या पिढीसाठी असलेला ठेवा आहे. हे पुस्तक महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास जगासमोर मांडत आहे.सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे नार्वेकरांनी महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणाचे केलेले ‘डॉक्युमेंटेशन’ आहे. पुढच्या पिढीसाठी उपयुक्त ठेवा आहे. शिंदे यांनी या वेळी ते पहिल्यांदा राज्यमंत्री झाले तेव्हा नार्वेकरांनी सर्वप्रथम लिहिलेल्या ‘स्टुलावरचा माणूस खुर्चीत बसला’ या लेखाची आठवण ताजी केली. शिवाय नार्वेकर यांच्या पत्रकारितेतील प्रवासामधील काही किस्सेही त्यांनी उलगडले. पुस्तक लिहायला आपले मन जागे असावे लागते; तेव्हाच आपण मनातली माणसं लिहू शकतो. नार्वेकरांनी त्यांच्या मनात अनेक माणसे साठवून ठेवली; त्यामुळेच ते असे पुस्तक लिहू शकले, असे मधू मंगेश कर्णिक यांनी सांगितले. विजया वाड म्हणाल्या की, मी या पुस्तकाची खूप वाट पाहिली. या पुस्तकात नार्वेकरांनी प्रेमाची चौफेर उधळण केली आहे. नार्वेकरांनी भारताच्या राजकारणातील महिलांवर या पुस्तकाचा दुसरा भाग लिहावा, अशी इच्छाही वाड यांनी या वेळी व्यक्त केली. पुस्तकाला कोकणातील लाल मातीचा वास आहे आणि कोकणातील सुपारीचा ठसकासुद्धा आहे. जी माणसे नार्वेकरांच्या मनात आहेत, तीच त्यांनी पुस्तकात उतरवली आहेत. या पुस्तकात नार्वेकरांनी त्यांच्या कुटुंबीयांबद्दलही लिहिले आहे. नार्वेकरांनी या पुस्तकात मोठ्या माणसाचे साधेपण आणि साध्या माणसाचे मोठेपण दाखवले आहे, असे अंबरीश मिश्र यांनी सांगितले.