Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांना लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार

By संजय घावरे | Updated: May 10, 2024 21:03 IST

‘मानाचि’ संघटनेचा नववा वर्धापनदिन संपन्न; उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘१४ इंचाचा वनवास’ची बाजी

 मुंबई - ‘लेखकांनी.. लेखकांची... लेखकांसाठी...’ स्थापन केलेल्या मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या म्हणजेच मानाचिच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘लेखक सन्मान संध्या’ सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यात ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांना लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पार पडलेल्या उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत संहिता क्रिएशन्स मुंबईच्या, ‘१४ इंचाचा वनवास’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत लेखन, दिग्दर्शन, अभिनेता, संगीत व सर्वोत्कृष्ट कथाविस्तार या पारितोषिकांवर मोहर उमटवली. 

मानाचि संघटनेचा नववा वर्धापनदिन दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात संपन्न झाला. या निमित्ताने उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी व लेखक सन्मान संध्येचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात गतवर्षीचे कारकीर्द सन्मान विजेते ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, अॅडगुरू भरत दाभोळकर, मानाचिचे अध्यक्ष विवेक आपटे आणि पुरुषोत्तम बेर्डे यांनी सुरेश खरे यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. यावेळी खरे म्हणाले की, हा माझा नाही, माझ्यातल्या सरस्वतीच्या अंशाचा सन्मान! खरे यांच्या सन्मानार्थ गंगाराम गवाणकर म्हणाले की, माझ्या कारकीर्दीला सुरेश खऱ्यांच्या नाटकाचा बॅकस्टेज वर्कर म्हणून सुरूवात झाली. पुढे सुरेश खरे आणि मी दोघेही नाट्यसंमेलनाचे अध्यक्षही झालो आणि मानाचिच्या लेखन कारकीर्द सन्मानाचे मानकरीही झालो असेही गवाणकर म्हणाले. या सन्मान संध्येत, मालिका, नाटक, चित्रपटांच्या प्रशंसनीय लेखनासाठी राकेश सारंग, अनिल पवार, अदिती मारणकर, कौस्तुभ देशपांडे, स्वप्निल जाधव, सचिन जाधव, क्षितिज पटवर्धन, नितीन सुपेकर यांचाही सन्मान करण्यात आला. ‘अर्थ आणि बँकिंग’ सदरासाठी राजीव जोशी, गणेशोत्सव देखाव्यांच्या लेखनासाठी विजय कदम, मानाचिच्या वाटचालीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मीडिया वनचे गणेश गारगोटे आणि उमेश ओमाशे यांनाही सन्मानित करण्यात आले. 

उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘१४ इंचाचा वनवास’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत लेखन, दिग्दर्शन, अभिनेता, संगीत व सर्वोत्कृष्ट कथाविस्तार या पारितोषिकांवर मोहर उमटवली. बीएमसीसी पुणे यांनी सादर केलेल्या ‘अ टेल ऑफ टू’ या एकांकिकेने दुसरा क्रमांक पटकावत, लेखन, दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा अशी पारितोषिके पटकावली. डॉ. गिरीश ओक, ईला भाटे, विश्वास सोहनी, हेमंत भालेकर व शिल्पा नवलकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. या वेळी उत्स्फूर्त एकांकिका या नाट्यप्रकारचे जनक सुहास कामत आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश बुद्धीसागर व प्रमोद लिमये यांचा प्रदीर्घ नाट्यसेवेबद्दल कृतज्ञता सत्कार करण्यात आला.

टॅग्स :मुंबई