Join us  

अनेक वर्षांनी एकत्र येणार लेखक, कवी सलीम-जावेद , मनसेच्या दीपोत्सवाला उद्या सुरुवात होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 12:00 PM

दिवाळीचे पहिले दीपप्रज्वलन ९ ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध पटकथाकार सलीम-जावेद यांच्या हस्ते होणार आहे.

मुंबई : ११ वर्षांपासून मुंबईकरांचा सोहळा अशी ओळख निर्माण झालेल्या शिवाजी पार्कवरील दीपोत्सवाला ९ ऑक्टोबरला सुरुवात होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या उत्सवाची सुरुवात केली आहे. यानिमित्ताने मुंबईकरांना आगळी वेगळी दिव्यांची दिवाळी अनुभवायला मिळेल.

दिवाळीचे पहिले दीपप्रज्वलन ९ ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध पटकथाकार सलीम-जावेद यांच्या हस्ते होणार आहे. शोले, डॉन, दिवार, शक्ती अशा एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमांचे पटकथाकार सलीम व जावेद या जोडीने सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवले. बॉलिवूडची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईत दिवाळीच्या निमित्ताने या जोडीला पुन्हा एकदा अनेक वर्षांनी एकत्र आणण्याची किमया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. 

गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले होते. यंदा सलीम-जावेद यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे, तर १० नोव्हेंबरच्या दीपोत्सवासाठी दिग्दर्शक राजकुमार हिरानी, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता विकी कौशल, लेखक अभिजात जोशी, निर्माते साजीद नाडीयादवाला, हे उपस्थित राहून दीप प्रज्वलन करतील, तर ११ नोव्हेंबरला मराठी सिनेसृष्टीतर्फे दीप प्रज्वलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सलीम-जावेद यांच्याशी राज ठाकरे यांच्या गप्पांची मैफलसलीम जावेद ही जोडी अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा एकत्र येत आहेत. उद्घाटनानंतर स्वतः राज ठाकरे हे सलीम - जावेद यांच्याशी संवाद साधणार आहेत. अनेक वर्षांनी हा योग या दिवाळीला जुळून येत आहे. या तिघांच्या गप्पा ऐकणे ही आगळी वेगळी दिवाळी मुंबईकरांना यानिमित्त अनुभवायला मिळणार आहे.

 मराठी संस्कृती, पुस्तके, दिवाळी अंक, फराळ अशा प्रदर्शनाचाही अनुभव लोकांना घेता येईल. शिवाय दिवाळी अंकाचा वेगळा स्टॉलही येथे उभारण्यात येत आहे.  समाजभान जपण्याच्या दृष्टीने सफाई कर्मचारी (१२ नोव्हेंबर), आरोग्य कर्मचारी (१३ नोव्हेंबर), अग्निशनम कर्मचारी (१४ नोव्हेंबर), पोलिस कर्मचारी (१५ नोव्हेंबर) यांना प्रत्येक दिवशी दीप प्रज्वलनाचा मान देण्यात आला आहे. हा कार्यक्रम रोज सायंकाळी साडेसहा वाजता होईल. 

टॅग्स :राज ठाकरेसलीम खानजावेद अख्तरदिवाळी 2023