Join us

स्व-बोलीभाषेत कवी कुसुमाग्रजांना लिहा पत्र 

By संजय घावरे | Updated: February 13, 2024 21:03 IST

'मराठी भाषेची चिंता आणि चिंतन' या विषयावर राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा.

मुंबई  - दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने राज्यस्तरील खुल्या लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा 'मराठी भाषेची चिंता आणि चिंतन' या विषयावर स्व-बोलीभाषेत पत्र स्वरूपातील असल्याने या निमित्ताने लेखकांना जणू कवी कुसुमाग्रजांना पत्र लिहिण्याची संधी मिळणार आहे. 

२७ फेब्रुवारी रोजी धुरू हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय येथे कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस साजरा करण्यात येणार आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय धुरु हॉल ट्रस्ट आणि मनसे विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या पार्थ फाउंडेशन मुंबईच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय खुल्या लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरणही होणार आहे. यानिमित्ताने मुबंईसह संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्र लेखक, निवृत्त व सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक, शिक्षक, साहित्यिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, मराठी भाषाप्रेमी यांच्यासाठी विनामूल्य 'मराठी भाषेची चिंता आणि चिंतन' या विषयावर स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची घोषणा संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केली आहे. कोसकोसावर बदलणाऱ्या महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषांनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे, पण आजचे दृश्य चिंताजनक आहे. खेड्यापाड्यांतली मराठी भाषा रांगडी अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असली तरीही ती 'मराठी'च म्हणून मराठी माणसाला आवडते. स्पर्धकांनी मराठी भाषेची सद्यस्थिती आपापल्या बोलीभाषेत व्यक्त करून ६०० शब्दांत लेख लिहिण्याची अपेक्षा आहे. पहिल्या तीन स्पर्धकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व इतरांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत लेख चळवळ १९४९ या जीमेलवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्व-बोलीभाषा म्हणजे अस्सल कोल्हापुरी, चंदगडी, आगरी, नागपुरी, मराठवाडी, अहिराणी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी, बाणकोटी, कोकणी, वऱ्हाडी, सोलापुरी तसेच महाराष्ट्रात इतर असलेल्या बोलीभाषा अपेक्षित आहेत. 

टॅग्स :मुंबई