Join us

मनसेने रोखल्या कचऱ्याच्या गाड्या

By admin | Updated: May 8, 2015 22:48 IST

उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद न केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कचऱ्याच्या

कल्याण : उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद न केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कचऱ्याच्या गाड्या रोखून धरण्यात आल्या. तसेच न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी केडीएमसी आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात त्यांच्या वतीने बाजारपेठ पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली.घनकचरा प्रकरणी उचित कार्यवाहीचे आदेश देऊनही याची ठोस अंमलबजावणी न झाल्याने १३ एप्रिलच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने केडीएमसीला चांगलेच फटकारले होते. महापालिका क्षेत्रातील नव्या बांधकाम परवानग्या रोखून धरताना आधारवाडी डम्पिंग ग्राउंड तातडीने बंद करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. ५ मेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने नवीन बांधकाम न करण्याबाबतचा दिलेला आदेश कायम ठेवला आहे. दरम्यान, आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या सूचना देऊनही आजतागायत इथेच कचरा डम्प केला जात असल्याच्या मुद्यावर मनसेच्या वतीने प्रशासनाला पत्र देऊन ते बंद करा, अन्यथा कचऱ्याच्या गाड्या रोखू, असा इशारा नुकताच दिला होता. याउपरही कचरा टाकणे सुरूच ठेवल्याने संतापलेले मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आधारवाडी डम्पिंगच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याच्या गाड्या अडवून प्रशासनाचा निषेध केला. प्रदेश सचिव इरफान शेख, शहराध्यक्ष तथा माजी आमदार प्रकाश भोईर, काका मांडले, जिल्हाध्यक्ष ऊर्मिला तांबे, जिल्हा उपसचिव स्वाती कदम आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. मनसेच्या आंदोलनाची माहिती मिळताच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रभारी अधिकारी सुरेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन चर्चेची विनंती केली. त्यावरून रोखलेल्या गाड्या मुख्यालयाकडे नेण्याचा निर्णय मनसेच्या वतीने घेण्यात आला. परंतु, पोलिसांनी दुर्गाडी चौकात या गाड्या ताब्यात घेतल्या. (प्रतिनिधी)