मुंबई : लालबागमध्ये काल रात्री दोन गटांमध्ये घडलेल्या हाणामारीप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यासह अन्य ठिकाणी दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कालच्या प्रकारानंतर रात्री मुंबईत काही ठिकाणी तणावाचे वातावरण होते. मात्र चोख बंदोबस्तामुळे वातावरणातला तणाव निवळला आहे.काल महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनामित्त शहरात ठिकठिकाणी मिरवणुका निघाल्या होत्या. अशाच एका मिरवणुकीतून परतणाऱ्या बाईकस्वारांची स्थानिक तरुणांसोबत भारतमाता परिसरात बाचाबाची झाली. एका बाईकवरून तिघे प्रवास करीत होते व गर्दीतून ते बेदरकार बाईक चालवत हाते. त्यांना स्थानिकांनी रोखले आणि जाब विचारला. यानंतर ही बाचाबाची झाली, असे भोईवाडा पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आले. मात्र या घटनेनंतर अफवांचे पेव फुटले. बाईकस्वारांनी वाहतूक पोलिसांना मारहाण केली, एका महिलेला धडक दिली, तणाव आहे, परिस्थिती गंभीर आहे, दंगल सुरू आहे, कर्फ्यु लागला आहे, अशा अफवा झटक्यात सर्वत्र पसरल्या. प्रत्यक्षात मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती केव्हाचीच नियंत्रणात आणली होती. इतक्यावरच न थांबता पोलिसांनी सर्वच मोबाइल कंपन्यांकरवी ‘परिस्थिती नियंत्रणात आहे, अफवा पसरवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका’, असे एसएमएस सर्वांना धाडले. कालच्या प्रकाराच्या निमित्ताने प्रकरण चिघळविण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठीही योग्य त्या उपाययोजना केल्या. पैगंबार यांच्या जन्मदिनी निघणाऱ्या मिरवणुका लक्षात घेऊन शनिवारपासूनच शहरात पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे आजही शहरात नाक्यानाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस उभे आहेत, हे चित्र दिसत होते. गुन्हे नोंदविले आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. तपासाअंती कारवाई करण्यात येईल, असे पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी) हल्ला पूर्वनियोजित : अल्पसंख्याक तरुणांवरील हल्ला हा पूर्णपणे पूर्वनियोजित होता, असे निरीक्षण नोंदवत समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश अल्पसंख्याक आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. मिरवणुकांवरून परतणाऱ्यांवर हल्ले होणार याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला होती का, असेल तर त्याबाबत काय उपाययोजना केली; सीसीटीव्ही चित्रणात हल्लेखोर स्पष्ट दिसत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले का, त्यांच्यावर कारवाई केली का, हल्ल्यात किती जण जखमी झाले, ही माहिती तातडीने उपलब्ध करून द्या, असेही आयोगाने बजावले आहे.
लालबागप्रकरणी दंगलीचा गुन्हा
By admin | Updated: January 6, 2015 02:23 IST