पारोळ : वसई परिसरात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने विटभट्टी व्यवसाईक व शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले.शनिवारी पहाटेच विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने वाजतगाजत पुन्हा एकदा हजेरी लावली. यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे चांगले हाल झाले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागाचा विचार केला असता भालीवली व निबोंळी या नवीन रस्त्याचे काम चालु असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने दुचाकीस्वारांना दुचाकी व चारचाकी चालवणे कठीण झाल्याने या भागातील कामगार, विद्यार्थी, यांच्यावर पायी चालण्याची वेळ आली. तसेच अगोदरच्या अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकरी व विटभट्टी व्यवसायीकांमधे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले पण काही वेळ पडल्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने या व्यवसायीकांनी सुटकेचा श्वास सोडला. (वार्ताहर) वाडा : आठवडाभरानंतर अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावत धुमाकूळ घातला. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास गडगडाटी पाऊस कोसळल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. आठवडाभरापुर्वी पावसाने आंब्यासहीत मोसमातील सर्वच फळझाडांना फटकारले आणि आता या पावसाने हाती आलेली मिरची, टॉमेटो हिसकावून घेतली आहे. बँक, सोसायटी यांच्याकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी लावेल्या मिरची-टॉमेटोचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. चिखले येथील मिरची उत्पादक शेतकरी मेघराज पाटील यांच्या अडीच एकर जागेतील मिरची पावसामुळे कोलमडून पडल्याने सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. बाजारात सध्या १२ ते १५ रू. भाव मिरचीला असून बाजारातील मंदी पाहता खर्चही वसुल होणार नसल्याची चिंता असतानाच पावसाने फटकारल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे मेघराज पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेकडून होत आहे.
शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण
By admin | Updated: March 14, 2015 22:10 IST