Join us

जागतिक हृदय दिन : दुसऱ्या हृदयासोबत मस्त चाललंय आमचं !

By संतोष आंधळे | Updated: September 29, 2022 06:00 IST

त्या ‘तिघी’ जगताहेत सर्वसाधारण आयुष्य

मुंबई : गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांत झपाट्याने वाढ होत असली तरी काही रुग्णांना मात्र औषधोपचार अथवा हृदयावरील शस्त्रक्रिया करूनही त्याचा काही उपयोग होत नाही. अशावेळी त्यांना दुसरे हृदय बसविणे हा एकमेव पर्याय असतो. राज्यातील विविध भागांतील तीन मुलींचे काही वर्षांपूर्वी हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या  तिघी इतरांप्रमाणेच सर्वसाधारण आयुष्य जगत आहेत. याचे सर्व श्रेय जाते ते मेंदूमृत व्यक्तीच्या अवयवदानाला संमती देणाऱ्या नातेवाइकांना. 

मुंबईतील वांद्रे परिसरात राहणाऱ्या होवोवी होमजी (२९) हिला आठ वर्षांपूर्वी चालताना खूप त्रास व्हायचा. होवोवीच्या कुटुंबियांनी तिला विविध डॉक्टरांकडे नेले. तपासणीत तिला हृदयविकाराचा त्रास असून हृदयाचे प्रत्यारोपण केले तरच ती जगू शकेल, असे स्पष्ट झाले. त्यावेळी महाराष्ट्रात हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत नव्हत्या. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चेन्नई येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे काही काळ काढल्यानंतर तिला मेंदूमृत व्यक्तीचे हृदय मिळले आणि तिच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. 

हवोवीची आई आरनाईटी होमजी सांगतात, ‘अवयवदात्याचे मी आभारी आहे, आज माझ्या मुलीला हृदय मिळून आठ वर्षे झाले. ती तिचे हे आयुष्य व्यवस्थित जगत आहे. तिने स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे. पुढील वर्षी ती लग्न करणार आहे. हृदय प्रत्यारोपण वैद्यकीय विश्वातील क्रांती आहे. मी याकरिता डॉक्टरांचे आभार मानते’. 

पनवेल येथील आराध्या मुळे तीन वर्षांची असताना तिला हृदयाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर ती वर्षभर दर १५ दिवसांनी रुग्णालयात दोन ते तीन दिवसांकरिता दाखल होत असे. डॉक्टरांनी तिला हृदय प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. याबाबत, आराध्याचे वडील योगेश मुळे यांनी सांगितले की, ‘इतक्या लहान वयात अशा पद्धतीचा आजार ऐकून मी आणि माझी बायको सुन्न झालो होतो. हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी तिच्या वयाचा किंवा एक ते दोन वर्ष मोठा असा अवयवदाता हवा होता. इतक्या लहान वयाचा अवयवदाता मिळणे खूप कठीण होते. मात्र, ५ सप्टेंबर २०१७ रोजी  सुरत येथे एक अवयवदाता मिळाला. त्याचे हृदय विमानाने मुंबईत आणले. मुंबईत आराध्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. आराध्या आता चौथी इयत्तेत असून तिची प्रकृती ठणठणीत आहे’.  

मदतीचे हात आले पुढे 

  • जालना येथील धनश्री मुजमुळे (९), हिला हृदयविकाराचा त्रास होत असल्याने औरंगाबाद येथील अनेक डॉक्टरांना दाखविल्यानंतर तिला हृदयाच्या प्रत्यारोपणाची गरज असल्याचे स्पष्ट झाले. 
  • धनश्रीचे वडील कृष्णा मुजमुळे म्हणाले की, ‘चार वर्षांपूर्वी या पद्धतीचा आजार आणि उपचाराचा लाखो रुपयांचा खर्च या सगळ्या गोष्टीने आम्ही भांबावून गेलो होतो. मात्र मदतीचे अनेक हात पुढे आले. अवयवदाता औरंगाबादचा असल्याने अनेक गोष्टी सोप्या झाल्या. 

भारतात हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था प्रस्थापित झाली आहे. त्याचे चांगले निकाल आपणास दिसून येत आहेत. विशेष म्हणजे अवयवदान आपल्याकडे अजून वाढण्याची गरज आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे जीव आपण वाचवू शकत आहोत. हृदय प्रत्यारोपणानंतर रुग्णाचे आयुष्य चांगले झाले असल्याची आज आपल्याकडे अनेक उदाहरणे आहेत. डॉ. के. आर. बालकृष्णन, ५५० हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ

टॅग्स :मुंबई