लोणेरे : लोणेरे येथील राष्ट्रीय दर्जाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील रोजंदारीवर काम करणाऱ्या १४३ कामगारांनी गुरुवारपासून आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.येथील अनागोंदी कारभारामुळे विद्यापीठ बदनाम होत असून कामगारांच्या निर्माण झालेल्या समस्यांमुळे विद्यापीठाच्या अडचणीत भर पडली आहे. विद्यापीठातील भारतीय कामगार सेनेच्या स्थानिक कामगारांना रोजंदारीवर काम करत असताना विद्यापीठ प्रशासनाने निर्माण केलेल्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे गुरु वारपासून १४३ कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. स्थानिक भारतीय कामगार सेनेच्या सदस्यांपैकीच लोकांना कामावर भरती करून घेणे, गेली वीस वर्षांपासून रोजंदारी स्वरूपातील कामगारांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये समाविष्ट करणे, शासनाच्या सुधारित किमान वेतन तरतुदीनुसार (जीआरप्रमाणे) वाढणाऱ्या वेतनाची अंमलबजावणी विद्यापीठामार्फत व्हावी, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे समाधानकारक वेतनश्रेणी रोजंदारी कर्मचाऱ्याला मिळावी, मासिक वेतन १ ते २ तारखेपर्यंत मिळावे अशी अपेक्षा कामगारांची आहे. अशा विविध मागण्या येथील कामगारांच्या आहेत. (वार्ताहर)लेखी आश्वासन टाळले-कुशल रोजंदारी २१० रु., अर्धकुशल रोजंदारी १८५ रु., प्रत्येक दिवसाचे वेतन मिळते. भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र प्रभारी कुलगुरू बाहेरगावी गेल्याने कुलसचिव सरगडे यांनी लेखी स्वरूपाचेआश्वासन कामगारांना देणे टाळले आहे.
लोणेरे विद्यापीठात कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन
By admin | Updated: July 3, 2015 22:58 IST