Join us
Daily Top 2Weekly Top 5

कामगार परतलेत, उद्योग आले रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:07 IST

मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने विविध क्षेत्रांवर घातलेले निर्बंध काही महिन्यांपूर्वी शिथिल करण्यात आले; पण कामगारवर्गाचा तुटवडा होता. ...

मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने विविध क्षेत्रांवर घातलेले निर्बंध काही महिन्यांपूर्वी शिथिल करण्यात आले; पण कामगारवर्गाचा तुटवडा होता. आता ८० टक्के कामगार कामावर परतले असून, उद्योग रुळावर आले आहेत.

एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक आणि अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे म्हणाले, कोरोनाचा आलेख कमी झाला आहे. त्याअनुषंगाने उद्योग सुरू झाले आहेत, निर्मिती क्षेत्रात वाढ होत आहे. कोरोना जात आहे. उद्योगांना अच्छे दिन येत आहेत. लोकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे. ९० टक्के कारखाने सुरू झाले आहेत. पण, जे काही कारणाने बंद पडले आहेत ते सुरू झाले नसून ते सुरू होण्यास उशीर लागेल.

उद्योग सुरू झाले असले तरी कच्च्या मालाचे दर वाढले आहेत, इंधन दर वाढले आहेत. त्यामुळे अडचणी येत आहेत. सरकारने थेट मदत उद्योजकांना केली नाही. आर्थिक सहकार्य किंवा दिलासा दिला नाही. त्यामुळे उद्योग क्षेत्र नाराज आहे. राज्य सरकारने कामगार निर्मिती हीच अपेक्षा न ठेवता उद्योग-धंद्यांच्या भरभराटीसाठी प्रयत्न करायला हवेत. त्यांना विकासासाठी सहकार्य करायला हवे. कोरोना काळात अनेक कामगार परत गेले होते. त्यातील २० टक्के कामगार अद्याप परत आलेले नाहीत. त्यांनी स्थानिक ठिकाणी काम सुरू केले आहे. ते कोरोना गेल्याशिवाय परत येणार नाहीत.

डिक्की संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे म्हणाले की, जवळपास ८० टक्के कामगार कामावर आले आहेत. २० टक्के जे कामगार आहेत ते पुन्हा येणार नाहीत असा अंदाज आहे. उद्योगधंदे पूर्णपणे सुरू आहेत. उद्योगाच्या ७५ टक्के क्षमतेने सुरू आहेत. मात्र कच्चा माल महागला आहे. त्याचा फटका लघू मध्यम उद्योगाला बसला आहे. कंपन्यांचे दर समान आहेत; पण कच्चा माल महाग झाल्याने काम करण्यास अडचणी येत आहेत. ब्लॅकलिस्ट होऊ नये म्हणून तोटा सहन करून काम करावे लागत आहेत. सूक्ष्म लघू मध्यम उद्योजकांना खेळत्या भांडवलाची अडचण आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा.