Join us

तळोजातील ग्लास कंपनीचे कामगार बेरोजगार

By admin | Updated: October 6, 2014 04:06 IST

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एका ग्लास कंपनीने कामगारांना तडकाफडकी कामावरून काढल्यामुळे शेकडो कामगार बेकार झाले आहेत.

नवी मुंबई : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एका ग्लास कंपनीने कामगारांना तडकाफडकी कामावरून काढल्यामुळे शेकडो कामगार बेकार झाले आहेत. यामध्ये प्लांटमध्ये काम करणारे ९१ कर्मचारी तर इतर ३९ कर्मचा-यांचा समावेश आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीने हा निर्णय घेतल्याने कर्मचा-यांचे कुटूंबही रस्त्यावर आले आहे.तळोजा औद्योगिक वसाहतीत १९८९ मध्ये ही कंपनी सुरू झाली. या वेळी कंपनीला चांगला नफाही मिळत होता मात्र कालांतराने या कंपनीचे सयंत्र वेळेवर दुरु स्त न केल्याने ती बंद पडली. त्याच्या दुरूस्तीसाठी येणारा १४० कोटींचा खर्च परवडणार नसल्याचे कारण पुढे करत कंपनी बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. याठिकाणी असलेल्या तीन प्लांटपैकी केवक एकच प्लांट सुरु असून तो कधीही बंद पडू शकतो. कोणतेही भत्ते न देता कंपनीने घेतेलेला निर्णय हा जीवघेणा असल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली. या विरोधात कर्मचारी संघटनेने कामगार न्यायालयात धाव घेतली आहे, मात्र तरीही कंपनीकडून कोर्टाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले जात नसल्याचे कामगार संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांंगितले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले होते. कामगार मंत्रालयाशीही पत्रव्यवहार करून आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नसल्याची खंत कामगारांनी व्यक्त केली. योग्य न्याय न मिळाल्यास सर्व कामगारांची कुटुंबे रस्त्यावर येणार असून याबाबत ग्लास लिमिटेड कंपनी प्रशासनाशी संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)