Join us  

सुरू असलेल्या गिरण्यांमधील कामगारांना घरांचा हक्क मिळावा! - सचिन अहिर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 5:08 AM

मुंबईतील बंद गिरण्यांप्रमाणे आता काम सुरू असलेल्या गिरण्यांतील कामगारांनाही शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घराचा हक्क देण्याची मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केली आहे.

मुंबई  - मुंबईतील बंद गिरण्यांप्रमाणे आता काम सुरू असलेल्या गिरण्यांतील कामगारांनाही शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घराचा हक्क देण्याची मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केली आहे. माजी गृहनिर्माण राज्यमंत्री व संघटनेचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी याबाबत शासकीय स्तरावर प्रयत्न करण्याचे प्रतिपादन केले आहे.दादर येथील दादासाहेब फाळके रोडवरील एन.टी.सी नियंत्रित टाटा मिलमधील कंत्राटी कामगारांना बदलीपास वाटपासाठी आयोजित केलेल्या गिरणी कामगारांच्या मेळाव्यात अहिर बोलत होते.कामगार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मिलचे महाव्यवस्थापक चंद्रमौली होते, तर संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुधाकर वड्डी हे मेळाव्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी कंत्राटी कामगारांना बदली पास देऊन संघटनेने एकप्रकारे नोकरीत सुरक्षितता प्राप्त करून दिल्याचे वक्तव्य अहिर यांनी केले. ते म्हणाले की, मुंबई विकास नियमावली ५२ अंतर्गत येथील बंद पडलेल्या खासगी, तसेच सरकारी गिरण्यांतील कामगारांना आघाडी सरकारने घराचा हक्क प्राप्त करून दिला.शासनाच्या या घरकुल योजनेतून म्हाडाद्वारे आतापर्यंत सुमारे १२ हजार घरे कामगारांना मिळाली आहेत. मात्र, ‘अच्छे दिन आयेंगे’ची घोषणा देत सत्तेवर आलेल्या युती सरकारकडून कामगारांना हक्काची घरे देण्यास टाळाटाळ होत असल्याची खंतही अहिर यांनी व्यक्त केली.मुंबईत चालू असलेल्या एन.टी.सी.च्या तीन तसेच जॉइंट व्हेंचरवर चालविण्यास घेतलेल्या चार गिरण्यांतील कामगारांनाही घराचा हक्क प्राप्त झाला पाहिजे, अशी भूमिका अहिर यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेचे कामगारांनी जोरदार स्वागत केले आहे. या चालू असलेल्या गिरण्यातील कामगारांच्या पगारवाढीच्या प्रश्नावर दिल्ली एनटीसी वरिष्ठांशी बोलणी करण्याचे आश्वासन अहिर यांनी त्यांच्या भाषणात दिले.एके काळी एन.टी.सी.ने तोट्यात चालणाऱ्या गिरण्या बंद करण्याचा सपाटा सुरू केला. मात्र, संघटनेने रस्त्यावर उतरून या गिरण्या चालू ठेऊन कामगारांची रोजीरोटी टिकविल्याचे गोविंदराव मोहिते यांनी सांगितले. ते म्हणाले की, कामगारांनी पारंपरिक गिरण्यांचा इतिहास पुसू न देता, त्या आपल्या उत्पादन क्षमतेने चालू ठेवल्या आहेत. म्हणूनच त्यांनाही घराचा हक्क प्राप्त झाला पाहिजे.महाव्यवस्थापक चंद्रमौली यांनी आपल्या भाषणात उत्पादनवाढीसाठी युनियन आणि कामगारांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. गिरणीचे संघटन सेक्रेटरी दीपक राणे आणि अन्य प्रतिनिधींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास विशेष सहकार्य केले.या कार्यक्रमाला कामागारांची उपस्थिती लक्षणीय होती़

टॅग्स :सचिन अहिरमुंबई