Join us  

‘बोगद्यामध्ये उतरणारे कामगार सुरक्षित राहणार’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 4:48 AM

पाण्याच्या टाकीत उतरलेला कामगार विषारी वायूमुळे गुदमरल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर महापालिकेचे धाबे दणाणले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अपघात असला तरी कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा यामुळे ऐरणीवर आला.

मुंबई  - पाण्याच्या टाकीत उतरलेला कामगार विषारी वायूमुळे गुदमरल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर महापालिकेचे धाबे दणाणले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अपघात असला तरी कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा यामुळे ऐरणीवर आला. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बोगद्यात अथवा जलवाहिनीत उतरण्यापूर्वी आतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कॅमेरा, आॅक्सिजन सिलिंडर, घातक वायूचा शोध घेणारे यंत्र अशा जीवरक्षक उपकरणांचा वापर बंधनकारक असणार आहे.नाना चौक येथील पाणीगळतीच्या तक्रारीचे निवारण करण्यास गेलेल्या जल अभियंता खात्याच्या कामगाराचा शनिवारी मृत्यू झाला. आणखी चार कामगारांची प्रकृती बिघडली. यापूर्वी सांडपाण्याच्या टाकीत असे अपघात घडले होते. पाण्याच्या टाकीत विषारी वायूच्या संपर्कात येऊन कामगाराचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या घटनेचा गांभीर्याने अभ्यास करून कामगारांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. तसे बदल लवकरच भूमिगत वाहिन्यांच्या सफाईवेळी अंमलात येतील.जलवाहिनी, उघडी गटारे अथवा जलबोगद्यात उतरताना सुरक्षेसाठी हेल्मेट, हातमोजे आणि गमबुट घालणे बंधनकारक आहे. अनेकवेळा कामगार हे नियम पाळत नाहीत. अशा दुर्घटना कधीच न घडल्यामुळे कामगारांप्रमाणे पालिका प्रशासनही याबाबत बेफिकीर होते. नाना चौक येथील दुर्घटनेनंतर या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अत्याधुनिक तंत्र वापरून कामगारांच्या सुरक्षेची खात्री करून मगच त्यांना अशा जोखमीच्या कामावर पाठविण्यात येईल़कॅमेऱ्याद्वारे जलवाहिनीची होणार पाहणीमलनिस्सारण वाहिनीतून विषारी वायूची गळती होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. जलवाहिनीतून वायुगळतीची ही पहिलीच घटना आहे.रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी गळती दुरुस्तीकरिता खोदकाम करण्यात आले नाही. पाणीगळतीची तक्रार सोडविण्यासाठी सहा फूट जलवाहिनीत शिरून गळती दुरुस्तीचे काम करण्यात येते.सुरक्षेसाठी हेल्मेट, हातमोजे आणि गमबूट सक्तीचे करण्यात आलेले आहे. यापुढे बोगदा अथवा वाहिनीत उतरण्यापूर्वी कॅमेरा सोडून जलवाहिनीतील आतील पाहणी करणे, आत उतरण्यास जिन्याचा वापर, दिवा, आॅक्सिजन सिलिंडर, वायुगळतीचा अंदाज घेणारे यंत्र वापरण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई