पनवेल : प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांची प्रशासनाने लवकर पूर्तता करावी या मागणीसाठी शुक्रवारी म्युन्सिपल युनियन या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने शुक्रवारी नगर परिषदेवर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये १00 पेक्षा जास्त कामगार सहभागी झाले होते. शासनाने नगर परिषदेचा आकृतीबंध मंजूर केला असला तरी गेल्या २५ वर्षांत नगरपरिषदेकडून नव्याने नोकर भरती झालेली नाही. यामुळे सध्या सेवेत असलेल्या शेकडो कामगारांवरील कामाचा ताण वाढला आहे. सफाई कामगारांना १९८७ ते २00८ शासन निर्णयानुसार मालकी हक्काची घरे, आवश्यक असलेली सुरक्षेची उपकरणे व इतर साहित्य, अनुकंपा तत्त्वावर नोकरभरती, कंत्राटी कामगारांना भविष्य निर्वाह निधी, एलआयसी, बोनस, गणवेश, भर पगारी रजा मिळावी या मागण्यांसाठी कामगारांनी पालिकेसमोर ठिय्या केला.नगरपरिषदेमध्ये ६५0 कंत्राटी कामगार आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, म्हणूनच हा मोर्चा काढल्याची माहिती म्युन्सिपल लेबर युनियनचे सचिव सतीश चंदालिया यांनी दिली. नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा केली. या मोर्चामध्ये संघटनेचे अध्यक्ष शरद कांबळे, उपाध्यक्ष कैलास सोळंकी, रमेश गांगरे, मुकेश वाघेला आदींसह शेकडो कामगार सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
पनवेल नगर परिषदेवर कामगारांचा मोर्चा
By admin | Updated: April 17, 2015 22:43 IST