नवी मुंबई : सफाई कामगारांना फक्त कायम करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांना कायमस्वरूपी करण्यात आले नाही. शहरातील जुन्या घरांच्या एफ.एस.आय. ला अजून मंजुरी मिळाली नाही. सत्ताधाऱ्यांकडून नवी मुंबईतील विविध समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे. नवी मुंबईतील सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सामान्य जनतेला आतापर्यंत फक्त आश्वासने दिली आहेत. त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. सफाई कामगारांना कायमस्वरूपी करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावरच सफाई कामगारांना कायमस्वरूपी करण्याचा प्रश्न पुढे येतो आणि निवडणुका संपताच प्रश्नही संपतो. त्यामुळे सर्व सफाई कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना कायमस्वरूपी करण्यासाठी महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा. तसेच अडीच एफएसआयचा प्रस्ताव लवकर मंजूर करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी म्हात्रे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली. कोट्यवधी रुपये खर्च करून समाजमंदिरे, वाचनालय आदी नागरिकांच्या सुविधेसाठी प्रत्येक विभागात इमारती उभारल्या आहेत. मात्र या इमारती सध्या धूळखात पडल्या आहेत. अनेक ठिकाणच्या समाजमंदिरांचा दुरुपयोग होत आहे. तरी याकडे प्रशासन आणि सत्ताधारी पक्षांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून जनतेच्या वापरासाठी खुले करण्यात येण्याची मागणी मंदा म्हात्रे यांनी केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भगवानराव ढाकणे, भाजपा नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सुनील होनराव,सचिन खाडे, नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणी सदस्य दादा मतलापूरकर, प्रशांत भोर, महेंद्र खरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कामगारांना फक्त आश्वासन नको
By admin | Updated: August 29, 2014 00:49 IST