Join us

गिरणी कामगारांचा ‘वर्षा’वर हल्लाबोल!

By admin | Updated: April 17, 2015 01:42 IST

हक्कांच्या घरांसाठी अनेक वर्षांपासून पदरी केवळ आश्वासने मिळणाऱ्या गिरणी कामगारांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी थेट ‘वर्षा’वर हल्लाबोल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : हक्कांच्या घरांसाठी अनेक वर्षांपासून पदरी केवळ आश्वासने मिळणाऱ्या गिरणी कामगारांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी थेट ‘वर्षा’वर हल्लाबोल करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दिनी सायंकाळी ४ वाजता ग्रँटरोड रेल्वे स्थानकाहून गिरणी कामगार वर्षा बंगल्यावर मोर्चा काढणार असून, यातून गिरण्यांच्या जमिनींचे हस्तांतर, कामगारांसाठी घरे बांधणे, लॉटरीची प्रक्रिया जलद करणे यांसारख्या मागण्या केल्या जाणार आहेत.गिरणी कामगारांचे घरांसबंधीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. १८ नोव्हेंबर २०१४ रोजी गिरणी कामगारांच्या पाचही संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देऊन गिरणी कामगारांच्या घरांसबंधी मागण्यांची माहिती दिली होती. यावर संबंधित अधिकारी वर्गासोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या आश्वासनाला आता पाच महिने उलटून गेले आहेत. मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे संघटनांच्या स्मरणपत्राचीही मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही. परिणामी, मुख्यमंत्री जाणीवपूर्वक गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत की काय? असा प्रश्न गिरणी कामगार कृती संघटनेला पडला आहे. खटाव मिलची गिरणी कामगारांच्या वाट्याची जमीन घेण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. १ लाख ४८ हजार गिरणी कामगारांनी घरांसाठी अर्ज केले आहेत. या अर्जाची नियमाप्रमाणे छाननी करावी आणि त्याची अंतिम यादी प्रसिद्ध करावी. १ लाख ४८ हजार गिरणी कामगारांना घरे मिळतील, असे धोरण सरकारने आखावे. च्सोळा गिरण्यांच्या जागेवर ८ हजार २ घरे बांधण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. एमएमआरडीएच्या ११ हजार घरांपैकी ३ हजार घरे बांधण्यासाठी पावले उचला. च्फिन्ले, जाम, सीताराम, मधुसूदन व कोहिनूर १, २ या गिरण्यांची जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी ताब्यात घ्यावी. च्इंडिया युनायटेड मिल १, अपोलो, गोल्ड आणि न्यू सिटी या गिरण्यांची ३९ एकर जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी देण्यात यावी अशा प्रमुख मागण्या आहेत.