Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या भीतीने कामगार धरताहेत परतीची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:06 IST

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन नेमका कधी लागू होईल, याचे उत्तर ...

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन नेमका कधी लागू होईल, याचे उत्तर माहीत नसले तरी गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये झालेले हाल पुन्हा हाेऊ नयेत, या भीतीने शहरातील कामगारांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. परिणामी उत्तर प्रदेश, बिहार, पटना, झारखंडला जाणाऱ्या गाड्या फुल्ल भरुन जात आहेत.

सध्या केवळ आरक्षित तिकीट असणाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे ज्यांना आरक्षित तिकीट मिळाले नाही, त्यांनी तत्काळ तिकीट काढण्यावर भर दिला आहे. काेराेनाच्या संसर्गामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण झाले. लॉकडाऊनमध्ये मजूर, कामगारांचे प्रचंड हाल झाले. हाताला काम नसल्याने उपासमार झाली. वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने अनेकांनी पायीच चालत आपले मूळ गाव गाठले, तर अवैधरित्या वाहनांमधून प्रवास करताना झालेल्या अपघातांमध्ये कितीतरी मजुरांनी आपले जीव गमावले. त्या दिवसांची पुनरावृत्ती नकाे, या भीतीने आताच मजुरांनी आपल्या गावी जाणे पसंत केले आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात टाळेबंदी केली जात असल्याने नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. काेराेना रुग्णांची संख्या वाढू लागली तर राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, राेजंदारीवरील कामगार टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नकाेत, या भावनेने कामगारांनी घरची वाट धरली आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, पनवेल, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत माेठी वाढ झाली आहे. एलटीटी टर्मिनसमधून दररोज लांब पल्ल्याच्या २० गाड्या चालविण्यात येतात. त्यात सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पटणाकरिता धावतात. या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. एलटीटी - गाेरखपूर, एलटीटी - वाराणसी, एलटीटी - पटना, एलटीटी-दरभंगा या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या माेठी आहे.

मी एका कंपनीत कामाला आहे, नाेव्हेंबर महिन्यात कामासाठी पुन्हा मुंबईत आलाे. परंतु आता पुन्हा लॉकडाऊनचे सावट आहे. मी कुटुंबासह चेंबूर येथे भाड्याने राहताे. लॉकडाऊन झाले तर जगायचे कसे, या चिंतेने पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला.

संतोष शर्मा, कामगार

दिवाळीच्या सुमारास कामानिमित्त पुन्हा मुंबईत आलाे. मिळेल ते काम करताे. काेराेना गेला की, कुटुंबाला आणावे, या विचाराने त्यांना आणले नाही. आता काेराेना पुन्हा वाढत आहे. काय हाेईल काय माहीत नाही, त्यामुळे वाराणसीला पुन्हा जात आहे.

अजयकुमार मौर्या