Join us  

हायड्रोलीक कार अंगावर पडल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू, चेंबूर येथील घटना

By मनीषा म्हात्रे | Published: May 30, 2023 6:56 PM

चेंबूरमध्ये इमारतीमध्ये सुरु असलेल्या हायड्रोलिक कार पार्किंगच्या दुरुस्तीदरम्यान, पाईपमधून मोठ्या प्रमाणात ऑईल गळती झाली.

मुंबई : चेंबूरमध्ये इमारतीमध्ये सुरु असलेल्या हायड्रोलिक कार पार्किंगच्या दुरुस्तीदरम्यान, पाईपमधून मोठ्या प्रमाणात ऑईल गळती झाली. गळतीमुळे हायड्रोलिकवरील प्रेशर कमी होऊन पार्किंगवर लावलेल्या कार पार्किंगसह खाली येऊन झालेल्या अपघातात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. योगेश जाधव (४०) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून तो कार दुरुस्तीचे काम करत होता. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी हायड्रोलिक कार पार्किंगच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या जे. डी. बी. कंपनीच्या मेकॅनिकसह कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील रोड नंबर १५ येथे असलेल्या एका इमारतीमध्ये कारचे लिफ्ट पार्किंग एका व्यक्तीच्या अंगावर पडले असल्याची माहिती चेंबूर पोलिसांना सोमवारी सायंकाळी मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता दहा मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या हायड्रोलिक कार पार्किंगच्या लिफ्टखाली इमारतीमध्ये हाऊसकिपिंगचे काम करत असलेला जाधव हा दबला असल्याचे पोलिसांना दिसताच याबाबत अग्निशमन दलाला कळविण्यात आले. पुढे, अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने गंभीर जखमी अवस्थेतील जाधवला बाहेर काढले. पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र तेथे दाखल कारण्यापूर्वीच मृत घोषित कारण्यात आले. याप्रकरणी चेंबूर पोलीस अधिक तपास करत आहे.

कंपनीचा मॅकेनिक विशाल भोसले हे काम करत असताना हायड्रोलिक कार पार्किंगच्या पाईपमधुन अचानक मोठ्या प्रमाणात ऑईल गळती झाली. हायड्रोलिकवरील प्रेशर कमी झाल्याने पार्किंगवर असलेल्या कार पार्किंगसह खाली आल्या आणि जाधवचा त्याखाली चिरडून मृत्यू झाला आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.  

टॅग्स :मुंबईमृत्यू