Join us  

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम सुसाट; 'एमएसआरडीसी'कडून जोरदार तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:09 AM

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याने या प्रकल्पाची कामे सुसाट सुरू आहेत.

मुंबई : वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याने या प्रकल्पाची कामे सुसाट सुरू आहेत. या प्रकल्पाचे समुद्रातील काम सुरू झाले असून आतापर्यंत तीन पिलरची उभारणी पूर्ण झाली आहे, तर पावसाळ्यापूर्वी आणखी सात पिलर उभारण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून  (एमएसआरडीसी) जोरदार तयारी सुरू आहे. 

एमएसआरडीसीकडून १७.७ किलोमीटर लांबीचा सागरी सेतू बांधण्यात येत आहे. सागरी मार्गावर ८ मार्गिका बांधल्या जाणार आहेत. यातील मुख्य सागरी सेतू ९.६० किमी लांबीचा असून, तो समुद्रात ९०० मीटर आतमध्ये उभारला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम २०१९ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी ऑगस्ट २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनामुळे प्रकल्प रखडला. त्यातच कंत्राटदार आर्थिक गर्तेत सापडल्याने टाळेबंदीनंतरही त्याने काम सुरू केले नाही. त्यामुळे या प्रकल्पात रिलायन्स इन्फ्राबरोबर भागीदारीत असलेल्या अन्य कंत्राटदाराने भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर अपको इन्फ्राटेक आणि वी बिल्ट यांनी २०२२ मध्ये कामाला सुरुवात केली. 

दरम्यान, या प्रकल्पाला विलंब झाल्याने प्रकल्पाच्या खर्चात ७ हजार २९२ कोटी रुपयांनी वाढ झाली असून प्रकल्पाचा खर्च ११ हजार ३३३ कोटी रुपयांवरून १८ हजार ६२५ कोटी रुपयांवर गेला आहे. 

एक हजार स्लॅब सेगमेंट तयार-

कारशेडच्या जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने पुन्हा या प्रकल्पाच्या कामाला विलंब झाला. आता अखेर सर्व अडथळे दूर झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पाचे सुमारे १६ टक्के काम पूर्ण झाले आहे.  एकीकडे पिलरच्या उभारणीचे काम सुरू असताना दुसरीकडे कास्टिंग यार्डमध्ये स्लॅब सेगमेंट बनविण्याच्या कामानेही गती पकडली आहे. सद्य:स्थितीत एक हजार स्लॅब सेगमेंट तयार करण्यात आल्या आहेत, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.

टॅग्स :मुंबईवर्सोवा