Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुर्ल्यातील हार्बर स्थानकाचे काम ‘उन्नती’च्या मार्गावर

By admin | Updated: February 23, 2017 04:37 IST

सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम करतानाच यातील कुर्ला स्थानकातील

मुंबई : सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम करतानाच यातील कुर्ला स्थानकातील हार्बर स्थानक हे एलिव्हेटेड (उन्नत) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता एलिव्हेटेडचे काम सुरू करण्यात आले असून गेल्या तीन आठवड्यांपासून काम केले जात असल्याची माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. त्याचबरोबरच शीव, परळ येथील नव्या प्लॅटफॉर्मचेही काम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. कुर्ला स्थानकात एलिव्हेटेड हार्बर स्थानक बांधतानाच तीन प्लॅटफॉर्म उभारले जातील. नव्याने बांधण्यात येणारा एलिव्हेटेड मार्ग कसाईवाडा ते टिळकनगर असा असेल. मध्य रेल्वेवर कुर्ला ते सीएसटीपर्यंत पाचवा-सहावा मार्ग तयार केला जाणार आहे. मात्र ही मार्गिका कुर्ला ते सीएसटीपर्यंत आणताना जागेची अडचण सतावत आहे. ही अडचण सोडविण्यासाठी कुर्ला स्थानकातील हार्बरचे दोन्ही प्लॅटफॉर्म एलिव्हेटेड बांधण्याचे नियोजन केले आहे. कुर्ला स्थानकात दोन अतिरिक्त मार्गिका असल्या तरी त्या मार्गिका मालवाहतुकीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे प्रस्तावानुसार हार्बरचे दोन प्लॅटफॉर्म आठ मीटर वर उचलण्यात येतील आणि त्याखालून पाचव्या-सहाव्या मार्गिकेला जागा मोकळी केली जाईल. हार्बरचे दोन प्लॅटफॉर्म एलिव्हेटेड बांधतानाच त्यासोबत आणखी एक प्लॅटफॉर्म एलिव्हेटेड बांधण्यात येईल. दोन प्लॅटफॉर्मवरून सध्या धावत असलेल्या सीएसटी ते पनवेल अशा नियमितपणे लोकलच जातील. तर एक प्लॅटफॉर्म हा टर्मिनस म्हणून बांधण्यात येणार असल्याने यामधून पनवेल, वाशीसाठी लोकल सुटतील. एलिव्हेटेडच्या कामाला सध्या गती देण्यात आली असून प्लॅटफॉर्म क्रमांक ९ च्या पूर्व दिशेला काम सुरू करण्यात आले आहे. हे काम करताना सध्या एलिव्हेटेडसाठी लागणाऱ्या खांबाचा पाया तयार केला जात आहे. काम करताना जुने रेल्वे ट्रॅक आणि लाकडी स्लीपर्सही सापडले असून ते उखडून टाकण्यात येतील, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)एक वर्ष लागणारकसाईवाडा ते टिळकनगरपर्यंत एलिव्हेटेड मार्ग बांधण्यासाठी तीन वर्षे तर कुर्ला स्थानकातील नवे हार्बर स्थानक उभारण्यासाठी एक वर्ष लागेल. रेल्वे उड्डाणपूल बांधल्यानंतर हा उड्डाणपूल कुर्ला स्थानकातून पुढे कसाईवाडा पुलाजवळ हार्बर मार्गावर उतरविण्यात येईल आणि नंतर सध्याच्या मार्गाला जोडण्यात येणार आहे. सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गात शीव स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या पश्चिम दिशेला आणि परळ स्थानकात मध्य व पश्चिम रेल्वेच्या मधील भागात असलेल्या नव्या प्लॅटफॉर्मच्या कामांनाही सुरुवात करण्यात आली आहे.