Join us

सिडको प्रदर्शन केंद्राचे काम अद्यापही सुरूच

By admin | Updated: September 24, 2014 02:36 IST

वाशीतील सिडकोच्या प्रदर्शन केंद्राच्या उद्घाटनानंतरही बहुतांश कामे सुरूच आहेत. तर कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या केंद्राला सुरक्षेचीही कमतरता दिसून येत आहे.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईवाशीतील सिडकोच्या प्रदर्शन केंद्राच्या उद्घाटनानंतरही बहुतांश कामे सुरूच आहेत. तर कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या केंद्राला सुरक्षेचीही कमतरता दिसून येत आहे. त्यामुळे सिडकोने अपूर्ण स्थितीतही प्रदर्शन केंद्राचे उद्घाटन उरकल्याची टीका सामान्यांकडून होत आहे. वाशी सेक्टर ३० ए येथे सिडकोने भव्य प्रदर्शन केंद्र उभारले आहे. त्यासाठी २५६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन ४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र उद्घाटन होऊनही केंद्रामध्ये कामे सुरूच आहेत. या भव्य प्रदर्शन केंद्रामध्ये अद्याप वीज पोचलेली नाही. तेथील विद्युत विभागाचे काम अजूनही सुरूच आहे. या कामामुळे सर्वत्र उघड्यावर विद्युत तारा पडल्या असून त्या अपघाताला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. मात्र विद्युत विभागाचे हे काम कधी पूर्ण होणार यासंदर्भात उत्तर कामाच्या ठेकेदाराकडून देखील मिळू शकलेले नाही. बहुउद्देशीय दालनात पार्टिशनचे फर्निचर काम सुरू आहे. त्याचे साहित्य केंद्रामध्ये इतरत्र पडलेले आहे. शिवाय झाडांचा पाचोळा साचलेला असताना देखील तेथे स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे प्रदर्शन केंद्राला अवकळा आली आहे. केंद्राच्या सुरक्षेत देखील सिडकोकडून हलगर्जीपणा होत आहे. केंद्राच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. मात्र कर्तव्य बजावण्याऐवजी हे सुरक्षा रक्षक पंप हाउसमध्ये आराम करत असतात. सुरक्षा रक्षक केबिनच्या काचा फुटलेल्या आहेत. या काचा कित्येक दिवसांपासून तशाच पडलेल्या आहेत. त्यामुळे या प्रदर्शन केंद्राची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसत आहे. प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकच नसल्याने कोणीही यावे कोणीही जावे अशी परिस्थिती या केंद्राची झाली असून परिसरातील भटक्या कुत्र्यांसाठी आश्रयस्थान झाले आहे. केंद्रामध्ये प्रवेशद्वाराजवळ अटकाव नसल्याने या कुत्र्यांनी तेथे आपला घरोबा केला आहे. तर बहुउद्देशीय दालनासह केंद्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्याकडून घाण केली जात आहे. य्ााची दुर्गंधी प्रदर्शन केंद्रामध्ये पसरत आहे. या केंद्रामध्ये बहुउद्देशीय दालनासह आॅडिटोरियम, वाचनालय अशा सुविधा पुरवल्या जाणार आहेत. मात्र मोठ्या थाटात उद्घाटन होऊनही नागरिकांना यापैकी एकाही सुविधेचा लाभ मिळालेला नाही. प्रदर्शन केंद्राचे बहुतांश काम शिल्लक असतानाही सिडकोने उद्घाटन घाईगडबडीत उरकण्याचा घाट का घातला असा सवाल नवी मुंबईकरांकडून केला जात आहे. तर यासंदर्भात सिडको अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.